हा डि.पी.रोड शासकीय मोजणी करून नियमानुसार रस्त्याची रुंदी कमी न करता तात्काळ पूर्ण करावा-दिगंबर सुडके

हा डि.पी.रोड शासकीय मोजणी करून नियमाप्रमाणे रस्त्याची रुंदी कमी न करता तात्काळ पूर्ण करावा – पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष दिगंबर सुडके

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- गेल्या अनेक महिन्यांपासून पंढरपूर शहरामध्ये नगरपरिषद हद्दीत विविध ठिकाणी डि.पी.रोडची कामे चालु आहेत.यामध्ये काही रस्ते कित्येक दिवसांपासून खोदून ठेवले आहेत तर काही अर्धवट अवस्थेतच आहेत.

त्यापैकी सांगोला रोडला जोडला जाणारा रेल्वे स्थानक, बस स्थानक, शासकीय विश्राम ग्रहाकडे जाणारा महत्त्वाचा असलेला कोकाटे प्राईड ते सांगोला रोड हा डि.पी.रोड शासकीय मोजणी करून नियमाप्रमाणे रस्त्याची रुंदी कमी न करता १५ मीटर रुंदीचा व ११०० मीटर लांबीचा रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात यावा या मागणीसाठी पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.

सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येणाऱ्या निवेदनामध्ये कोकाटे प्राईड ते सांगोला रोड हा शहरातून बाहेरून वाहतूक काढण्यासाठी महत्त्वाचा डि.पी रोड १५ मी रुंदीचा व ११०० मीटर लांबीचा असताना सदरच्या रस्त्याचे काम प्रत्यक्षरीत्या मार्गावर प्रवेश करताना कोकाटे प्राईडकडून सुमारे ३०० मीटर अंतरापर्यंत १५ असताना १२ मीटर रस्त्याची रुंदी करण्यात आल्याने पुढील काळात एसटी बस व इतर वाहनांमुळे या मार्गावरील होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सदरचा रस्ता नकाशा प्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत १५ मीटर रुंदीचा करावा.

सदर डि.पी. रोड चालु करण्यापुर्वी नगरपालिकेने भुमी अभिलेख यांचेकडून रस्ता मोजणी करून हद्द खुणा कायम करून घेणे गरजेचे असताना तसे न करता न.पा.अभियंता यांनी रोजंदारी कर्मचार्यां मार्फत रस्ता हद्द खूणा करून दिल्याने अनेक ठिकाणी सुरू असलेल्या डीपी रस्त्याच्या मोजमापात तफावत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच रस्त्याच्या कामासाठी शासकीय मोजणी केली गेली नसल्यामुळे रस्त्यामध्ये बाधित झालेल्या जमीन मालकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला गेलेला नाही. त्यामुळे बाधित जागा मालकांचे दुहेरी नुकसान होत आहे. तरी भुमी अभिलेख यांच्याकडून रस्त्याची मोजणी करून मोबदला देण्यात यावा. रस्त्याच्यामध्ये जे मेनहोल आहेत त्याचे कव्हर हे टेंडरप्रमाणे बसविण्यात यावेत. याचबरोबर पंढरपुरात सुरू असलेल्या सर्व कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चीत करावी व सुरुवातीला ३ मीटर रस्ता रुंदी कमी केली आहे ती नकाशा प्रमाणे १५ मीटर रुंदी करून पुर्ण करावा आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिगंबर सुडके यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Back To Top