वीज वितरणचे कंत्राटी कर्मचारी मृत्यू प्रकरणी तंत्रज्ञ तेजसिंह गणपाटील निलंबीत

वीज वितरणचे कंत्राटी कर्मचारी मृत्यू प्रकरणी तंत्रज्ञ तेजसिंह गणपाटील निलंबीत

मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा शहरातील दामाजी कारखाना चौकात मायाक्का मंदिराजवळ कंत्राटी कर्मचारी अतिश जयराम लांडे वय वर्षे 28, रा.मंगळवेढा हा विद्युत खांबावर काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान या घटनेनंतर वीज वितरण कंपनी पंढरपूरचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी तुकाईनगर भागात कार्यरत असलेले तंत्रज्ञ तेजसिंह गणपाटील रा.मरवडे याला निलंबीत केले असल्याची माहिती मंगळवेढ्याचे उपकार्यकारी अभियंता महेश शिपुरे यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की रविवार दि.18 मे रोजी दुपारी 2 वाजता नागणेवाडी येथील मायाक्का मंदिर परिसरात एका वीज ग्राहकाच्या तक्रारीवरुन कंत्राटी कर्मचारी अतिश लांडे व तंत्रज्ञ तेजसिंह गणपाटील सदर विद्युत डीपीच्या ठिकाणी आले होते. कामानिमित्त खांबावर अतिश लांडे हे चढले होते. यावेळी त्याला शॉक बसल्याने ते जमिनीवर फेकले गेल्याने त्याच्या मेंदूला गंभीर मार लागून ते जखमी झाले होते. जखमी अवस्थेत सोलापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह वीज वितरणच्या दारात ठेवून जवळपास एक हजाराच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करीत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली होती.या घटनेनंतर पंढरपूरचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी गणपाटील यांना निलंबीत केल्याचा आदेश गुरुवार दि.22 रोजी सकाळी मंगळवेढा वीज वितरण कार्यालयाला प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात आले.

मयत अतिश लांडे याला मरवडे विभागात सुरुवातीला नेमणूक दिली होती मात्र तेथे जागा रिक्त नसल्याने पुन्हा मंगळवेढा शहराकडे वर्ग करण्यात आले होते. नागणेवाडी परिसरातील एका ग्राहकाने वैयक्तिक वीजेबाबत तक्रार केल्याने सदर दोघेजण संबंधीत डी.पी.जवळ जावून काम करत होते.दुर्दैवाने या तरुणाचा घटनेत मृत्यू झाला.तो मुळचा मंगळवेढा शहरातील असल्यामुळे मंगळवेढ्यातील मोठा समुदाय घटनेप्रसंगी अभूतपुर्व लोटला होता.वीज वितरण कार्यालया कडून वारंवार प्रशिक्षण घेवून कर्मचार्‍यांना सुरक्षेबाबत सुचना दिल्या जातात मात्र त्या पाळल्या जात नसल्यामुळे अशा दुर्घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सुरक्षा साधने वापरणे तसेच डोक्याला हेल्मेट घालणे आदी महत्वाचे असताना त्याचा वापर केला गेला नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top