17 ऑगस्ट : क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा यांच्या बलिदान दिन

17 ऑगस्ट : क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने….

क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा

भारतीय क्रांतिकारकांचा इतिहास पाहिला तर, पंजाबमधील आद्य क्रांतिकार म्हणून मदनलाल धिंग्रा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मदनलाल धिंग्रा यांचा 17 ऑगस्ट हा बलीदानदिन ! त्यांच्याविषयी

मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी, 1883 साली पंजाबमधील एका क्षत्रिय घराण्यात झाला. सन 1906 मध्ये ते आगबोटीवर काम करुन स्वकष्टाने इंग्लंडला गेले. सन 1908 पासून स्वातंत्र्यवीर सावरकर, शामाजी कृष्णवर्मा इ. च्या सहवासात आल्यावर त्यांच्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित होऊन मदनलाल यांच्यातील क्षात्रतेज व देशप्रेम जागृत झाले. त्यांनी कर्झन वायली या दुष्ट जुलमी व भारतद्वेषी अधिकार्‍याला संपविण्याचा निश्चय केला. लंडन येथील नॅशनल इंडियन असोसिएशनच्या सभेला व समारंभाला कर्झन येणारे आहे. ही खात्रीलायक बातमी मदनलाल यांना समजली होती. समारंभात मदनलाल यांनी चार गोळया झाडल्या. कर्झन हे तत्काळ जागेवर ठार झाले. मदनलाल यांना तेथेच पकडण्यात आले. लंडन येथील पेन्टेनव्हिली या करागृहात दि. 17 ऑगस्ट 1909 रोजी सकाळी 9 वाजता या क्रांतिवीराला फाशी देण्यात आली.

   मदनलाल यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते व ते तितक्याच स्पष्टपणे व्यक्त करीत असत की, ‘परकीय शस्त्रात्रांच्या सहाय्याने दास्यात जखडून पडलेले राष्ट्र हे निरंतरच युध्दमान राष्ट्र होय. नि:शस्त्रांना उघडपणे रणांगणात उतरुन सामना देणे अशक्य असल्यामुळे मी दबा धरुन हल्ला चढविला. बंदुका तोफा वापरायची मला परवानगी नाही म्हणून मी पिस्तूल वापरले. भारतीयांजवळ मातृभूमीसाठी देता येईल, तर ते स्वत:चे रक्तच होय.’

मदनलाल हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रहात होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळया टेबलवर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलाल यांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की,हीअशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट. मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी देशभक्तांनी अनेक मार्ग शोधले. इंग्रजांना जरब बसावी यासाठी देशभक्तांनी क्रांतीकारक मार्गाने लढा दिला. तसेच राष्ट्ररक्षण व ब्रिटिशांपासून सुटका यासाठी अनेक क्रांतीकारक संघटना उदयास आल्या. मदनलाल धिंग्रा हे अभिनव भारत या क्रांतीकारकी संघटनेचे सदस्य बनले. सन 1909 मध्ये या जहाल क्रांतीकारकाने लंडनमध्ये एका माजी इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला. धिंग्रा यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या क्रांतीकारकाच्या रक्तातून महान स्वातंत्र्याची बिजे रूजली हे जास्त महत्वाचे आहे.

   17 ऑगस्ट 1909 ला मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. त्यांचा मृतदेहसुद्धा अग्नीसंस्कारासाठी मित्रांना न देता पेंटनव्हील कारागृहातच पुरण्यात आला. आई-वडील, पत्नी व मुलगा यांना हिंदुस्थानातच सोडून आलेल्या धिंग्रांचे या वेळी वय होते फक्त 25 वर्षे ! राजधानीत एका उच्चपदस्थ इंग्रजाला कंठस्नान घालणार्‍या या महान क्रांतीकारकाला शतशः प्रणाम !

संकलक : श्री. राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: