पांडुरंगाच्या कपाळावर असलेल्या टिळ्याचे गूढ रहस्य व त्यामागील तत्वज्ञान उलगडले..
डॉ.सचिन अनिल पुणेकर संकल्पित, संशोधित आणि लिखित कुंडलिनी आणि पंढरीची वारी: प्रवास मोक्षाकडे… या माहिती-पत्रकाचे व बोधचिन्हाचे विमोचन

पुणे /डॉ अंकिता शहा- कुंडलिनी योग आणि पंढरीची वारी ही भारताची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे.या दोन्ही परंपरेचे मार्ग जरी वेग-वेगळे असले तरी त्यांचा हेतू किंवा उद्दिष्ट हे मात्र सारखेच असावेत.या दोन्ही शास्त्र आणि परंपरेच्या माध्यमातून तुम्ही ईश्वर- भगवत प्राप्ती अर्थात मोक्षप्राप्ती निश्चित साधू शकता. देहू-आळंदी ते पंढरपूर पायी वारी ही पंढरीची वारी म्हणून सर्वांना ज्ञात आहे.पंढरीची वारी हे भारताचे, महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक ऐश्वर्य मानले जाते.तमाम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातील आणि इतर क्षेत्रातील विठ्ठलभक्तांचं हे श्रद्धास्थान. शेकडो वर्षांची दैदिप्यमान, वैभवशाली परंपरा जपणाऱ्या वारकरी, शेतकरी,कष्टकरी या अनोख्या वारीत देहभान हरपून टाळ, मृदुंगाच्या गजरात विठू माऊलीच्या व संतांच्या नामस्मरणात तल्लीन होत लाखोंच्या संख्येत सहभागी होतात आणि सरतेशेवटी पांडुरंगाच्या-विठ्ठलाच्या चरणी लीन होतात.ती केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती मानवी मनाला शांती, आनंद आणि एकात्मतेची अनुभूती देणारी एक प्रक्रिया आहे.कुंडलिनी शक्ती ही एक भारतीय आध्यात्मिक संकल्पना आहे जी पाठीच्या कण्याचा तळाशी, मूलाधार चक्रात, सुप्त अवस्थेत असलेली एक दैवी ऊर्जा मानली जाते.ही शक्ती जागृत झाल्यावर आत्म- जागरूकता आणि आध्यात्मिक वाढीसाठी महत्त्वाची मानली जाते.

आषाढी एकादशीचे औचित्य साधून अध्यात्म,सामाजिक चळवळींचे व स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीचे महत्वाचे केंद्र असणाऱ्या श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट पुणे येथे डॉ.सचिन अनिल पुणेकर संकल्पित लिखित आणि संशोधित कुंडलिनी आणि पंढरीची वारी: प्रवास मोक्षाकडे… या हरित पत्रकाचे विमोचन आणि पांडुरंगाच्या कपाळावर असलेल्या टिळ्याचे गूढ रहस्य व त्यामागील तत्वज्ञान सांगणाऱ्या बोधचिन्हाचे अनावरण देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाला आणि रुख्मिणी मातेला सुवर्ण पिंपळ बीजाभिषेक करण्यात आला आणि बीजप्रसाद उपस्थित भाविकांना वाटण्यात आला. शिवाय मंदिर परिसरातील काळभैरव देवराई परिसरात अध्यात्मिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या देव-वृक्ष, ज्ञान-वृक्ष असलेल्या अजानवृक्षाचे रोपण देखील करण्यात आले.सदर उपक्रमाचे आयोजन बायोस्फिअर्स संस्था,श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट पुणे,माऊली हरित अभियान,मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या कार्यक्रमप्रसंगी श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट पुणे चे अध्यक्ष दिलीप बांदल,कोषाध्यक्ष दिपक थोरात,बायोस्फिअर्सचे अध्यक्ष तथा पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ.सचिन अनिल पुणेकर, लायन्स इंटरनेशनल डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर राजेश अगरवाल,अभय शास्त्री,झबजरंग आकडे,दिलीप थोरात,गिरीश गणात्रा,शैलेंद्र पटेल,गिरीश गोखले,अभिजित भसाळे, दिपक रोंघे,अमर लांडे,संतोष डिंबळे,श्रीकांत कुऱ्हाडे,मंगेश चव्हाण,महादेव चव्हाण, सुरेश तरलगट्टी,पांडुरंग गायकवाड आदींसह भाविक आणि वारकरी संप्रदाय उपस्थित होते.

पांडुरंगाचा कपाळावर असलेल्या टिळ्याचे गूढ रहस्य व त्यामागील तत्वज्ञान: पंढरीच्या पांडुरंगाच्या कपाळावरील टिळा हा शेषनागाचे प्रतीक आहे अर्थात सर्पाचे प्रतीक आहे.कुंडलिनी ही सर्पाप्रमाणेच आहे.हा टिळा शिवलिंगा प्रमाणे आहे. शिवलिंग जर वरून बघितले तर ते आडव्या केलेल्या पांडुरंगाच्या कपाळावरील टिळ्यासारखे दिसते. शिवाय पांडुरंगाचा कपाळावरील टिळा हा पालखी मार्ग आणि कुंडलिनी योगिक क्रियादेखील दर्शवतो.कुंडलिनी जागरणा मध्ये जशी षट्चक्रे असतात त्याचप्रमाणे पंढरीच्या वारीमार्गा वरील विविध प्रमुख विसावे एकप्रकारे षट्चक्रच आहेत.या षट्चक्रात शरीरातील नाड्यांच्या जाळ्यांचे केंद्र असते. मला स्फुरल्याप्रमाणे वारी मार्गावरील देहू- आळंदी हे मूलाधार चक्र आहे.इडा नाडी ही ज्ञानोबा पालखी मार्ग आहे.पिंगला नाडी ही तुकोबा पालखी मार्ग आहे आणि सुषुम्ना नाडी ह्या दोन्ही पालखी मार्गीकेंच्या मधून देहू-आळंदी ते पंढरपूरकडे प्रवाही होणारी समन्वयाची भूमिका बजावणारी, शक्तीचा शिवतत्वापर्यंतचा प्रवास घडवणारी मार्गिका आहे. पुणे हे स्वाधिष्ठान चक्र आहे जेथून इडा (ज्ञानोबा पालखी) आणि पिंगला नाडी (तुकोबा पालखी) दोन भिन्न मार्गाने मार्गस्थ होतात.पुढे ज्ञानोबा-तुकोबांचे व इतर पालखी सोहळे वाखरी या विसाव्याला एकवटतात ज्याप्रमाणे इडा,पिंगला आणि सुषुम्ना आज्ञाचक्रात एकमेकांना भेटतात. त्यामुळे वारी मार्गावरील वाखरी हा विसावा कुंडलिनी मार्गीकेतील आज्ञाचक्र आहे.

वाखरीत अर्थात आज्ञाचक्रात एकवटलेल्या पालख्या म्हणजे कुंडलिनी शक्ती पुढे सुषुम्ना नाडीतून पंढरपूर अर्थात सहस्त्रार चक्राकडे मार्गस्थ होते आणि याच सहस्त्रारचक्रात म्हणजेच पांडुरंगात कुंडलिनी शक्ती शिवतत्वात विलीन होते. इथे शक्ती म्हणजे वारकरी आणि पांडुरंग म्हणजे अंतिम शिवतत्व होय.थोडक्यात काय पंढरीची वारी हा शक्तीचा विविध नाड्यांतून षट्चक्रांना भेदून शिवतत्वा पर्यंत असलेला मोक्ष प्राप्तीचा प्रवास आहे.शक्तीचा म्हणजे वारकऱ्यांचा शिवतत्वाकडे म्हणजे पांडुरंगाकडे होणारा हा प्रवास चित्ररूपी मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी ईश्वरी प्रेरणेतून इथे केला आहे.ही शब्द आणि चित्ररूपी सेवा आषाढीच्या निमित्त पांडुरंग चरणी अर्पण करतो आणि म्हणतो बम बम भोले, प्रकृती के राज खोले… राम कृष्ण हरि