तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्या प्रकरणी तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करा

श्रीक्षेत्र तुळजापूर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ व धार्मिक संघटना यांची एकमुखी मागणी

तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करा

जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी स्थानिक संघटना व ग्रामस्थ यांची बैठक बोलवावी

तुळजापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ जुलै २०२५– श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम सुरू होण्यापूर्वीच मंदिर परिसरातील २० उपदेवतांची मूर्ती हलवण्यात आल्या आहेत. मंदिर रचना बदलाची कामे सुरु करताना कोणतीही योग्य ती काळजी न घेतल्याने प्राचीन श्री ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणा मुळे दुभंगली आहे.त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अनेक तक्रारी करूनही गेली अडीच महिने दोषी शासकीय अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हे का दाखल झाले नाही ? दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केली.

तुळजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विनोद रसाळ,हिंदू जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे,पाळेकर पुजारी नागनाथ भांजी, पाळीकर मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे,महंत इच्छागिरी महाराज,महंत माऊली नाथ महाराज, परमेश्वर भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम,हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे परिक्षीत साळुंखे उपस्थित होते.

अनादी कालापासून मंदिरात चालू असलेले कुलाचार, वंश परंपरा व अन्य धार्मिक कृतीसाठी कुठलीही जागा आराखड्यात न ठेवणे हे गंभीर असून ते हिंदूंच्या श्रद्धेवर आघात करण्यासारखे आहे. त्यामुळे स्थानिक पुजारी मंडळ, हिंदुत्वनिष्ठ संघटना,धार्मिक संघटना,ग्रामस्थ यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.विशेषतः गाभाऱ्यातील सभामंडपाला तडे गेल्याने त्याचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.मंदिर रचनेत कोणतेही बदल करतांना अथवा नवीन विकास आराखडा अंतिम करण्यापूर्वी मूळ मंदिराच्या ऐतिहासिक,धार्मिक तसेच वास्तुरचनेला कोणताही छेद दिला जाणार नाही, याची शासनाने खात्री देण्याची आवश्यकता आहे.

श्रीब्रह्मदेवाची मूर्ती आधीच भंगलेली असल्याचा दावा दिशाभूल करणारा व खोडसाळ आहे.पूर्वी ती मूर्ती अखंड व व्यवस्थित होती.त्याचे पुरावे आहेत.मूर्त्या हलवतांना श्रीब्रह्मदेव मूर्ती दुंभली असल्याने त्याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई आवश्यक आहे.मंदिर विकास आराखड्यात पारदर्शकता यावी. लेखी दस्तऐवज जाहीर करण्यात यावे. आराखड्याचा धार्मिक दृष्टिकोनातून आढावा घेण्यासाठी धर्मशास्त्राचे अभ्यासक, धर्माचार्य आणि शंकराचार्य पिठांचे विचार जाणून घेणे अत्यावश्यक आहे. कुलाचार, प्राचीन परंपरा, वंशप्रथा यासाठी स्वतंत्र जागा आराखड्यात स्पष्टपणे दर्शवावी.मुख्य प्रवेशद्वार पूर्वीप्रमाणेच ठेवावे.मागून नवीन द्वार तयार करून मंदिराची रचना बदलू नये.

आराखड्याबाबत सर्व स्थानिकांचे मते विचारात घ्यावे

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजापूर संरक्षण कृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, पुजारी मंडळ,स्थानिक ग्रामस्थ यांची एक बैठक जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी बोलवावी. या बैठकीत आराखडा व मंदिरासंदर्भातील सर्व सूत्रांबाबत चर्चा करणे आवश्यक आहे, अशीही ठाम मागणीही यावेळी सर्व संघटनांनी केली.

Leave a Reply

Back To Top