वर्दीतील कर्मचाऱ्यांवरचा हल्ला म्हणजे संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अपमान: डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यातील खडकी परिसरात पोलिसांवर हल्ला; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

वर्दीतील कर्मचाऱ्यांवरचा हल्ला म्हणजे संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अपमान,सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची गरज : डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील खडकी येथील चर्च चौकात ३१ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चार जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेबाबत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांवर अशा प्रकारचा हल्ला हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले की, पोलीस हे समाजाच्या सुरक्षेचा आधारस्तंभ आहेत. वर्दीतील कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे केवळ पोलीस दलाचाच नाही, तर संपूर्ण न्यायव्यवस्थे चाही अपमान आहे. अशा घटना समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या ठरतात. विशेष म्हणजे, हल्ल्याच्या वेळी उपस्थित नागरिकांनी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतल्याचे निरीक्षण झाले असून, हेही चिंतेचे कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेतील आरोपींना कोणताही जामीन मिळू नये आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासकीय अभियोक्त्या मार्फत न्यायालयात ठोस व सखोल बाजू मांडली जावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे. तसेच, कर्तव्यावर असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे, वॉकी-टॉकी, GPS ट्रॅकिंग प्रणाली आणि पोर्टेबल SOS बटण यांसारख्या आधुनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून अशा घटनांचे वेळेवर आणि अचूक निदान करता येईल व पोलिसांची सुरक्षा सुनिश्चित होईल, असेही त्यांनी सुचवले आहे.

पोलिसांबाबत जनतेमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवावी, असेही त्यांनी नमूद केले. यासाठी स्थानिक समुदाय, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्यात यावेत. नागरिक आणि पोलीस यांच्यातील परस्पर विश्वास व संवाद वाढल्यास अशा घटनांना आळा बसू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि पोलीस दलाचे मनोबल वाढवण्यासाठी त्वरीत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Back To Top