मुख्याधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय,स्वतः बोटीतून उतरत भरकटलेल्या पर्यटकांची केली सुटका
सातारा/प्रतिनिधी,ता.२२/१०/२०२५- महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णा लेकवर आज एक थरारक प्रसंग घडला. बोटीतून फिरताना दिशाभूल झालेल्या काही पर्यटकांची महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी स्वतः थेट तलावात उतरून सुटका केली.त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

दिवाळी सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. गर्दीच्या वातावरणात काही पर्यटक स्पीड बोट घेऊन तलावाच्या आतल्या भागात गेले मात्र जंगल परिसरात ते भरकटले. मार्ग चुकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाकडे मदतीचा संपर्क साधला.
योगायोगाने त्याच परिसरात उपस्थित असलेले मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी प्रसंगाची माहिती मिळताच वेळ न दवडता बचाव पथकासह स्वतः बोट चालवत शोध मोहीम सुरू केली.त्यानंतर त्यांनी पर्यटकांची बोट शोधून त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले.
या धाडसी कृतीबद्दल पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास टाकत मुख्याधिकारी योगेश पाटील आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले.महाबळेश्वरकर आणि प्रशासन या तातडीच्या कार्यवाहीबद्दल कौतुकाचा वर्षाव करत आहेत.