११३ वर्षांच्या परंपरेला सलाम,पंढरपूर अर्बन बँकेला नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५ चा मानाचा सन्मान

११३ वर्षांच्या परंपरेला सलाम! पंढरपूर अर्बन बँकेला नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५ चा मानाचा सन्मान

संस्कारित सहकाराची यशोगाथा — पंढरपूर अर्बन बँकेला राज्यस्तरीय गौरवाचा नवराष्ट्र मानकरी पुरस्कार

दि.पंढरपूर अर्बन बँकला नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५चा मानाचा सन्मान

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरव संस्कारित सहकाराचा दीप पुन्हा उजळला

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव करणाऱ्या नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५ या प्रतिष्ठित सन्मानाने यावर्षी सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी आणि ११३ वर्षांची परंपरा लाभलेली दि. पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पंढरपूर ही संस्था गौरवली गेली आहे.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार बँकेस प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात वस्त्रोद्योग मंत्र संजय सावकारे, आमदार प्रवीण दरेकर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार फेडरेशन), आमदार विनय कोरे (अध्यक्ष, वारणा समूह), आमदार प्रसाद लाड, तसेच प्रविण दराडे (मुख्य सचिव, वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य) आदी मान्यवर उपस्थित होते.

या सन्मानाचे पारितोषिक बँकेच्या वतीने चेअरमन सतीश मुळे, संचालक हरीश ताठे, मनोज सूरवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, व्यवस्थापक गणेश हरिदास आणि विशाल तपकिरे यांनी स्वीकारले.

दरवर्षी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना नवराष्ट्र समूहाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी दि. पंढरपूर अर्बन बँकची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याने बँकेच्या कार्यक्षमतेची आणि पारदर्शकतेची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे.

या गौरवाच्या क्षणी बोलताना चेअरमन सतीश मुळे म्हणाले, श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांनी दाखवून दिलेल्या संस्कारित सहकाराच्या मार्गावर आम्ही प्रामाणिकपणे वाटचाल करत आहोत.आमचे कुटुंबप्रमुख प्रशांत परिचारक  यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ,अधिकारी आणि सेवकवर्ग एकदिलाने बँकेच्या प्रगतीसाठी कार्यरत आहेत. ग्राहकांचा विश्वास आणि सभासदांचे सहकार्य हेच आमच्या यशाचे खरे बळ आहे. हा पुरस्कार आम्ही सर्व ग्राहक, सभासद आणि हितचिंतकांना समर्पित करतो.

मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, सहकार क्षेत्रातील आमच्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन आम्हाला सन्मानित करणाऱ्या नवराष्ट्र समूहाचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो . हा पुरस्कार आमच्या सहकार मूल्यांच्या कार्याची प्रेरणा अधिक दृढ करणारा ठरेल.

११३ वर्षांची गौरवशाली परंपरा, संस्कारित नेतृत्व आणि सेवाभावातून फुललेला विश्वास – याच आधारावर दि. पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. सहकाराच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे आणि या राज्यस्तरीय गौरवाने त्या प्रवासाला एक नवे सुवर्ण पान लाभले आहे.

Leave a Reply

Back To Top