दाही दिशा हे पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे लिखित दाही दिशा या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई,दि.४ नोव्हेंबर २०२५ : दाही दिशा हे पुस्तक सामाजिक,राजकीय,शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करते. हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहे आणि महिलांच्या प्रश्नांवर सर्व बाजूंनी विचार करण्यास प्रवृत्त करणारं आहे,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


यशवंतराव चव्हाण सेंटर येथील यशोदर्शन (मुख्य) सभागृहात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित दाही दिशा या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी,सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ, सकाळ मुंबई आवृत्तीचे संपादक राहूल गडपाले, सकाळ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगिर,अंकित काणे (संपादक मल्टीमीडिया) आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,आम्ही भूमिका घेतली आणि राज्यामध्ये रखडलेले प्रकल्प पुढे नेले.विकास प्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या.सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली.शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा विषय मार्ग निघाला. कितीही काटकसर असली तरीसुद्धा जे वचन दिले आहे,जे शब्द आम्ही दिलेले आहेत ते पाळणार आहे. महिला सक्षमीकरण अभियान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, लेक लाडकी, लखपती योजना, महिलांना एसटीमधून प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत योजना, मुलींना उच्च शिक्षणासाठी १०० टक्के सवलत योजना,पिंक रिक्षा आणि सारथी,महाज्योती यांच्या माध्यमातून मुलींना शिष्यवृत्ती योजना अशा लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत,असेही त्यांनी सांगितले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातल्या अन्यायग्रस्त आणि वंचित,गोरगरीब महिलांसाठी अविरतपणे काम केले आहे. ‘दाही दिशा’ हे त्यांचं पुस्तक म्हणजे या संघर्षाची कहाणीच आहे. हे पुस्तक फक्त आत्मचरित्र नाही तर एका संवेदनशील कार्यकर्त्याची अनुभव गाथाच असल्याचे असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या पुस्तकात नीलम ताईंनी त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला आलेले अनुभव अशा रीतीने मांडले आहेत की ते आपल्या हृदयाला भिडतात. नीलमताईंचा प्रवास हा केवळ राजकीय नाही, तर सामाजिक जागृतीचा प्रवास आहे. महिलांसाठी फिरते मदत केंद्र सुरू करण्यापासून ते राज्यासाठी महिला धोरण ठरवण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांचे मोठे योगदान आहे. महिला अत्याचाराच्या घटना असो, मुलींना मुरळी बनवण्याची प्रथा बंद करणे असो, महिला सरपंचांना अधिक बळ देणं असो अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी महिलांच्या हक्कासाठी ठामपणे भूमिका घेतली आहे.

नीलमताईंच्या लहानपणीच्या आठवणीही या पुस्तकात आहेत. त्यांच्यावर पंढरपूरचे त्यांचे आजोबा-आजी आणि आई- वडिलांनी दिलेले संस्कार, शिक्षणाचे महत्त्व आणि सर्व जग विरोधात गेले तरी जिंकता येते ही शिकवण यात दिसते. महाविद्यालयीन जीवनात, त्यांनी युवकांच्या चळवळींमध्ये सहभाग घेतला आहे, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आणि मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या भूमिका त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतात असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
संघर्ष महत्त्वाचा तशी सबुरी फार महत्त्वाची
- विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे याप्रसंगी म्हणाल्या,आतापर्यंत मी 29 पुस्तके गेल्या 30 वर्षांत लिहिलेली आहेत. महिला धोरणे जी वेगवेगळी झाली, त्याचबरोबर स्त्रियांच्या अत्याचाराच्या विरोधात प्रतिबंध करण्यासाठी काय करता येईल, याची यशस्वी झालेली उदाहरणे या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत.
आरक्षण मिळाले परंतु संरक्षण मिळालं नाही. त्यावेळेला आम्हाला मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंनी विचारलं, तुम्ही मला एक कार्यक्रम सांगा की कुठला कार्यक्रम केला तर महिलांना फायदा होईल. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं, की महिलांनी दारूच्या विरोधात जी आंदोलनं केलेली आहेत, त्याच्यामधल्या महिलांच्या वर जे गुन्हे दाखल झाले ते तुम्ही काढून टाका, आणि तिसऱ्या दिवशी 32,000 महिलांवरचे गुन्हे मागे घेण्यात आलीत. अशी अनेक उदाहरणं आहेत असे सांगून डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पण हे काम करत असताना, अनुभव येत होता, जसा संघर्ष महत्त्वाचा आहे तशी सबुरी फार महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

दाही दिशा म्हणजे काय तर पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य बरोबर, ऊर्ध्व आणि अध्व या दहा दिशांनी येणारी जी संकटं आहेत, त्याचा मुकाबला करण्यासाठी, आम्हाला दाही दिशांनी शक्ती दे परमेश्वरा असा त्याचा अर्थ आहे. दैनिक सकाळ मधील एका सदरामधून दर शनिवारी लेख छापून येत होते. त्याच्यातील निवडक लेख आणि साधारण १९९५ सालापासून ते २००५ पर्यंतचा कालावधीतील काही अनुभव या सर्वांचा समावेश करुन हे पुस्तक प्रकाशन झाले आहे असेही त्यानी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राहूल गडपाले यांनी केले. सूत्रसंचलन उत्तरा मोने यांनी केले.





