विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या आश्वासनानंतर पुण्याच्या शिवसेना भवन समोरचे आंदोलन स्थगित

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या आश्वासनानंतर पुण्याच्या शिवसेनाभवन समोरचे आंदोलन स्थगित

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती, पुणे यांच्यावतीने स्मारकासाठी आरक्षित ४०५, मंगळवार पेठ, मालधक्का चौक, पुणे येथील जागेबाबत आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. ही जागा 2000 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणासाठी आरक्षित करण्यात आली होती; तसे सांस्कृतिक झोन म्हणून PMC व राज्य शासनाकडे नोंदही आहे.

परंतु MSRDC ने ही जागा २०२३ मध्ये एन जी वेंचर या बांधकाम कंपनीला भाडे कराराने दिल्याने गेल्या वर्षभरापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. यापूर्वी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावरही आंदोलन झाले होते. दरम्यान, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेवर कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर आज शिवसेना भवन, स्वारगेट येथे मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला.

समन्वयक शैलेंद्र मोरे, दीपक गायकवाड, नीता अडसुळे, स्वाती गायकवाड, शिवसेना महिला संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, युवासेना सचिव किरण साळी, शिवसेना शहरसंघटक आनंद गोयल, उपशहरप्रमुख नितीन पवार, अर्चना केदारी, सिद्धार्थ ओव्हाळ, निखिल दुर्गाई, सचिन साठे, आशुतोष भोसले, अनुराधा बनसोडे, जीवन घोंगडे, आनंद घेडे, जुलेखा खान आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेना भवनसमोर जमले होते.

आंदोलनाची माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी भवनमध्ये बोलावले. त्यांनी प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या तातडीने पोहोचवल्या.

२ डिसेंबर २०२५ नंतर उपमुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यां सोबत स्मारक जागेबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. MSRDC ची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणासाठी मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

सोमवार दुपारी ३ वाजता विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात याबाबत स्वतंत्र आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून आंदोलनकर्त्यांनाही त्यासाठी बोलावले आहे.चर्चा सकारात्मक झाल्याने आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र त्यांनी शासनाने पुणे महानगर पालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी स्मारकासाठी जागा देण्याचा लेखी अध्यादेश काढावा आणि MSRDC–एन जी वेंचर करार त्वरित रद्द करावा, या मागण्या ठामपणे मांडल्या.

समितीने स्पष्ट केले की त्यांच्या मुख्य मागण्या मान्य होईपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील जनआक्रोश आंदोलन सुरूच राहील. आजची चर्चा सकारात्मक ठरल्याने स्मारकाच्या दिशेने विषय पुढे गेला असून आंदोलनकर्त्यांनी याला लढ्याचे अंशतः यश असे म्हटले आहे.

Leave a Reply

Back To Top