संभाजीराजेंनी शिवबंधन बांधलं नाही तर काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्लॅन B रेडी!मुंबई : छत्रपती संभाजीराजेंना खासदार व्हायचं असेल तर त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करावा. उद्या दुपारी १२ वाजता त्यांनी शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर यावं, अशी अटच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली आहे. शिवसेनेच्या अटीनंतर संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना शिवसेनेने दबावाचं राजकारण खेळायला सुरुवात केली आहे. जर संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंच्या निरोपाला प्रतिसाद दिला नाही तर शिवसेना पक्ष निष्ठावान कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला राज्यसभेची उमेदवारी देईल. विशेष म्हणजे ग्रामीण भागातल्या कट्टर शिवसैनिकाचा राज्यसभेसाठी विचार होऊ शकतो, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून समोर येतीये.

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना आणि संभाजीराजेंच्या खासदाकीचा निर्णय झालेला नसताना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज दुपारी छत्रपती संभाजीराजेंची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यानंतरच्या तासाभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजेंना विशेष मेसेज दिला आहे. राजे, उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या, असा निरोप त्यांनी संजय राऊतांकरवी संभाजीराजेंना दिला आहे. मात्र संभाजीराजेंना कोणत्याही पक्षाचा शिक्का नकोय. म्हणूनच ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तयार नाहीयेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर सेनेने आणखी एक डाव टाकून संभाजीराजेंसमोर नवी अडचण निर्माण केलीये.

जर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला नाही तर शिवसेना पक्ष ग्रामीण भागातील कट्टर कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला राज्यसभा उमेदवारीची संधी देऊ शकते. पक्षात असे अनेक पदाधिकारी आहेत, की जे गेली अनेक वर्ष पक्षाची भूमिका धीरोदात्तपणे मांडत आहेत, पक्षाची ध्येयधोरणे लोकांसमोर घेऊन जात आहेत. त्यामुळे जर संभाजीराजेंनी शिवसेनेला आवश्यक प्रतिसाद दिला नाही तर शिवसेनेने प्लॅन बी रेडी ठेवला आहे. उद्या-परवा पर्यंत वाट पाहून शिवसेना पुढील निर्णय घेईल, अशी माहिती कळतीये.

शिवसेनेचं शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला

आज दुपारी शिवसेनेचं शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला हॉटेल ट्रायडंट येथे गेलं होतं. खासदार अनिल देसाई, उदय सामंत, मिलिंद नार्वेकर हे संभाजीराजेंच्या भेटीला गेले होते. राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला गेले होते. त्यानंतर काहीच वेळात उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी निरोप पाठवला आहे. “उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी वर्षा बंगल्यावर या”, असा निरोप उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना दिला आहे. तर संजय राऊतांनी संभाजीराजेंना फोन केल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तब्बल पाऊण तास संभाजीराजेंशी चर्चा केली. यादरम्यान शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा निरोप संभाजीराजेंना दिला. राज्यसभेवर वर्णी लावण्यासाठी संभाजीराजेंना शिवसेना पक्षप्रवेशाची अट ठेवण्यात आली आहे. यापूर्वीही संभाजीराजे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जी चर्चा झाली तेव्हाही हा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवण्यात आला होता. पण, संभाजीराजेंनी मला शिवसेना पुरस्कृत उमेदवार नाही तर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार घोषित करा, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार घोषित करा, अशी भूमिका घेतली. मात्र, आता संभाजीराजेंनी शिवसेना पक्षप्रवेश करावा, हाती शिवबंधन बांधावं, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी राऊतांकरवी संभाजीराजेंना दिलाय.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: