राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार–2025’ : महाराष्ट्रातील चमकत्या प्रतिभांचा गौरव

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार–2025’ : महाराष्ट्रातील चमकत्या प्रतिभांचा गौरव

विज्ञान भवनात महाराष्ट्राचा मान उंचावला : दिव्यांगजनांच्या कर्तृत्वाला राष्ट्रीय सलाम


नवी दिल्ली, दि. 3 – आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाच्या औचित्याने आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार–2025’ प्रदान करण्यात आले. विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, दिव्यांगजन सशक्तिकरण विभागाच्या सचिव श्रीमती बी. विद्यावती तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रतिभांना राष्ट्रीय मान

महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती आणि संस्थांनी या पुरस्कारात आपली गुणवत्ता सिद्ध करत राष्ट्रीय स्तरावर नाव चमकवले आहे.

  • सुश्री अबोली विजय जितना (नागपूर) – सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्कार. त्या नागपूरच्या पहिल्या व्हीलचेअर मॉडेल व प्रेरणादायी वक्त्या आहेत.
  • भाग्यश्री मनोहर नादी मित्तला कन्ना (पुणे) – श्रवणबाधित असूनही कला व कौशल्य प्रशिक्षणाद्वारे 500 हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व.
  • कुमारी धृती रांका (पुणे) – श्रेष्ठ दिव्यांग बाल-बालिका पुरस्कार. ‘टिकलर आर्ट’ची संस्थापक; न्यूरो-डायव्हर्स कलाकारांना प्रोत्साहन; शार्क टँक इंडियासह अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर सहभाग.
  • सुश्री देवांगी पराग दलाल (मुंबई) – समाजसेविका व ऑडिओलॉजिस्ट; जोश फाउंडेशनद्वारे 2000 हून अधिक मुलांना मोफत श्रवणयंत्रे व थेरपी.
  • जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर (मुंबई) – बौद्धिक व विकासात्मक दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तिकरणासाठी सर्वोत्तम संस्था.
  • बॅरियर ब्रेक सोल्युशन्स प्रा. लि. (मुंबई) – डिजिटल Accessibility प्रोत्साहनासाठी सर्वोत्तम आयटी सुगमता पुरस्कार.

दिव्यांगजन समानतेचे भागीदार – राष्ट्रपती मुर्मू

पुरस्कार वितरणावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, दिव्यांगजन हे समान हक्कांचे भागीदार असून त्यांच्या प्रगतीशिवाय देशाची प्रगती अपूर्ण आहे.सरकारचा दृष्टिकोन कल्याणकारी वरून अधिकार–आधारित व सन्मान–केंद्रित असा बदलल्याचे त्यांनी सांगितले.

सुगम्य भारत अभियान, 2016 चा दिव्यांगजन अधिकार कायदा, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यांचा उल्लेख करत राष्ट्रपतींनी दिव्यांगजनांच्या उन्नतीसाठी सरकारचे प्रयत्न नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात दृष्टिहीन विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी थापा यांच्या सरस्वती वंदनेने झाली.


Leave a Reply

Back To Top