अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरील शारिरिक अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

सांताक्रुझ येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरील शारिरिक अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ एप्रिल २०२४: सांताक्रुझ (प.) येथील एका शाळेत इयता तिसरीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेत काम करणाऱ्या एका शिपायाने शारीरिक अत्याचार केल्याची घटना दि.३० मार्च २०२४ रोजी उघड झाली आहे. सदरची घटना ही अत्यंत निंदनीय असुन याची सखोल चौकशी होणे आवश्यक असून संबंधित आरोपीने या प्रकारचे कृत्य अन्य मुलींसोबत केले आहे का याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रधान सचिव शिक्षण विभाग, शिक्षण निरीक्षक मुंबई महानगरपालिका, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना निवेदनाद्वारे दिले आहेत.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पुढीलप्रमाणे निवेदनाद्वारे निर्देश दिले आहेत,

१) सदरच्या घटनेचे CCTV फुटेज व ईतर आनुषंगिक पुरावे पोलीस तपास अधिकाऱ्यांना तात्काळ देण्यात यावे.

२) पीडीत मुलगी व तिच्या कुटुंबियांचे शाळेतर्फे चांगल्या समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात यावे.

३)आरोपी शिपयास तात्काळ निलंबित करून त्यावर गुन्हा नोंद करावा. यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

४)शाळेच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांचे चारित्र्य व सचोटी पोलीस यंत्रणेकडून तपासुन घेण्यात यावे.

५)सदरच्या घटना भविष्यात घडणार नाहीत याबाबत शाळेतर्फे करण्यात येणाऱ्‍या उपाययोजनाचा कृतिशील आराखडा सादर करावा.

६) पीडित मुलीला मनोधैर्य योजनेद्वारे मदत मिळवून द्यावी.

७) मुलींना शाळेत शिक्षण घेतांना सुरक्षितता वाटावी, त्यांना कुठलेही भय असू नये याबाबत तसेच त्यांच्या सुरक्षिततेकरिता करावयाची सर्वसमावेशक उपाययोजना याबाबत प्रधान सचिव शिक्षण विभागांतर्फे SOP (Standard Operating Procedure) बनविण्यात यावे व त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळामधुन करण्यात यावी.

या निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल तात्काळ माझ्या कार्यालयास सादर करण्यात यावा असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *