अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाची धडक मोहीम -सात होड्या व तराफे नष्ट
पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाई -महसूल व पोलीस दलाची संयुक्त मोहीम
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज/उमाका, दि. 08 : पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेत महसूल व पोलीस पथकाने सात लाकडी होड्या तसेच थर्माकोलचे तराफे नष्ट केले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार लंगुटे यांनी विशेष पथके तयार केली आहेत. या पथकांनी भीमा नदी पात्रातील चिंचोली– भोसे येथे चार होड्या तर इसबावी येथे तीन होड्या जप्त करून नष्ट केल्या.

तसेच नगरपालिका बंधाऱ्यालगत वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे थर्माकोलचे तराफेही नष्ट करण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत सुमारे 8 लाख रुपयांचे साहित्य नष्ट करण्यात आले.

या संयुक्त मोहिमेत मंडळ अधिकारी विजय शिवशरण तसेच ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील,गणेश पिसे, प्रमोद खंडागळे, संजय खंडागळे, योगेश कदम, विराज लोटेकर,दिगंबर डोईफोडे, सुमित जाधव,नितीन कोलगे,सागर जगताप,समीर पटेल,महेश सावंत आणि पंढरपूर शहर पोलीस विभागातील श्री.पाटील व श्री.सर्जे यांनी सहभाग घेतला.

तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्याची आवश्यकता असून वाळू वाहतूक करणारी वाहने रात्री अपरात्री पहाटे बिगर नंबरची अत्यंत वेगाने पळवत असतात त्यामुळे सातत्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत.तक्रार कोण करणार आणि कोणाकडे हा मोठा प्रश्न आहे.

