स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर स्थापन; नीति आयोगासोबत सामंजस्य करार
पंढरपूरच्या विकासाला नवी चालना स्वेरी- एसीआयसी आणि नीति आयोगाचा महत्त्वपूर्ण करार
पंढरपूर/गोपाळपूर,दि.११ डिसेंबर २०२५ – गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) येथे अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (ACIC) स्थापनेसाठी नीति आयोगा सोबत ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नवसंकल्पना,उद्योजकता व संशोधनाला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वेरीचे माजी अध्यक्ष कै. दादासाहेब रोंगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.स्वेरीचे sveri संस्थापक व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी स्वेरीची संशोधन, नवकल्पना, तंत्रज्ञान विकास व उभारलेली पायाभूत सुविधा यांचा आढावा घेत ACIC स्थापनेमध्ये नीति आयोगाचे महत्त्व अधोरेखित केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विज्ञान तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.पी.एम.पवार यांनी स्वेरीची संशोधन परंपरा,ग्रामीण समाजासाठीचे योगदान आणि शेतकऱ्यांसाठी झालेले तंत्रज्ञानातील कार्य विशेषत्वाने मांडले.
IIT माजी विद्यार्थी असलेल्या व्हील्स ग्लोबल फाउंडेशनचे सुजाता नरसिंहन आणि महेश वैद्य यांनी समाजासाठी योगदान देण्याचे महत्त्व सांगत भविष्यात संयुक्तपणे अधिक काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अटल इनोव्हेशन मिशन (AIM) चे कार्यक्रम प्रमुख प्रतीक देशमुख यांनी सांगितले नीति आयोगाच्या माध्यमातून समाजातील गरजा व समस्या ओळखून त्यावर नवे उपाय, नवे तंत्रज्ञान व नवी उत्पादने निर्माण करणारे इनोव्हेशन सेंटर उभारले जात आहेत.समाजाच्या उन्नतीसाठी उपयुक्त उत्पादनांना ACIC वाव देईल.
या केंद्राद्वारे नवउद्योजकांना सुविधा, स्टार्टअप्सना मार्गदर्शन,संशोधनासाठी साधने,प्रोटोटाइप विकास,प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विकसित भारत 2047 च्या दिशेने हे केंद्र भक्कम पाऊल मानले जात आहे.
MoU कार्यक्रमास अटल इनोव्हेशन मिशनचे वितस्ता तिवारी,दीपाक्षी जिंदाल, पंढरपूरचे विविध मान्यवर, सरपंच पांडुरंग देवमारे,डॉ.स्नेहा रोंगे,सचिन पाटील, मोहन पाटील,सचिन वाघमारे,संभाजी शिंदे,सौ.नंदा मोरे,शेतकरी, महिला वर्ग, प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.हर्षवर्धन रोंगे होते तर सूत्रसंचालन डॉ.यशपाल खेडकर यांनी केले.
सोबस इनसाईट फोरमचे संस्थापक दिग्विजय चौधरी यांनी रोजगारापेक्षा उद्योजकतेचे महत्त्व सांगत प्रोडक्ट डेव्हलपमेंट ते मार्केटिंगपर्यंत सर्व टप्प्यांचे मार्गदर्शन केले.

