आटपाडीला फक्त एकच आणि भव्य एस.टी. स्टॅन्ड हवे – सादिक खाटीक
60 वर्षांच्या इतिहासाला न्याय द्या; नवे एस.टी.स्टॅन्ड मुळ ठिकाणीच उभा करा – सादिक खाटीक यांची मागणी
आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१२/ २०२५ –आटपाडी शहरातील 1965 पासून चालत आलेल्या मुळ एस.टी. स्टॅन्डच्या जागीच 50 कोटी रुपयांचा भव्य दिव्य एस.टी. स्टॅन्ड उभारावा,अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी केली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्टॅन्ड विभागण्याचा प्रयत्न हा आटपाडीकरांवरील अन्याय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जमीन संपादन आवश्यक असेल तर राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवरच ते करून घ्यावे.

सध्या नुतनीकरणासाठी 4.50 कोटींची तरतूद असल्याचे सांगितले जात असले तरी पंचायत समिती आणि एस.टी. डेपोसमोरील भागात आणखी एक नवीन स्टॅन्ड उभारण्यासाठी 27 कोटी रुपयांचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. हा निर्णय मुळ आटपाडी आणि जुन्या स्टॅन्डच्या ऐतिहासिक महत्त्वाला धक्का देणारा असल्याचे खाटीक यांनी नमूद केले.
मुळ आटपाडी शहराची ओळख, रौनक आणि अस्मिता जपण्यासाठी जुन्या जागीच एस.टी. स्टॅन्ड साकारावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. बाजारपेठ, मुख्य रस्ता आणि स्टॅन्ड परिसर बकाल होऊ नये, तसेच प्रगतीपासून शहर मागे राहू नये यासाठी सर्व मोठ्या सरकारी कार्यालयांची उभारणी मुळ आटपाडीच्या लगत व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
याच अनुषंगाने आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रिक्त होणाऱ्या जागेत नगरपंचायतीचे नवे मुख्यालय उभारण्याची मागणी त्यांनी जोरदारपणे केली.15 कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव असल्याचीही चर्चा आहे.

एस.टी. स्टॅन्डची मुळ ठिकाणी उभारणी झाल्यास माडगुळे, लेगरेवाडी, शेटफळे, करगणी, चिंचाळे, वलवण, बनपूरी, तडवळे, भिंगेवाडी, आंबेवाडी, बोंबेवाडी यांसह 60 पैकी 36 पेक्षा जास्त गावांना मोठा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.उर्वरित गावेही या निर्णयाचे समर्थन करतील असा विश्वास सादिक खाटीक यांनी व्यक्त केला.

