कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या चार महिला खेळाडूंची आंतर विद्यापीठ क्रिकेट संघात निवड
पंढरपूरच्या चार कन्यांनी मिळवला क्रीडा गौरव; आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड
कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील पूजा माने,आकांक्षा रोंगे,तनवी माने व अमृता आगवणे यांची सोलापूर विद्यापीठाच्या आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड; राजस्थान येथे होणार स्पर्धा.
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज –रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उज्वल यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील पूजा माने, आकांक्षा रोंगे, तनवी माने आणि अमृता आगवणे या चार महिला खेळाडूंची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे.

ही प्रतिष्ठित आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धा राजस्थान येथील बनस्थली विद्यापीठात होणार असून, या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडू विद्यापीठासह महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विद्यापीठस्तरीय निवड चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत या खेळाडूंनी आपल्या मेहनतीची व गुणवत्तेची चुणूक दाखवली. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि संघभावना यामुळेच हे यश मिळाल्याचे क्रीडा विभागाकडून सांगण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव तसेच सर्व उपप्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक वर्ग यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. याशिवाय शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनिल परमार,प्रा.विठ्ठल फुले आणि प्रा. मनोज खपाले यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राजस्थान येथे होणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळाडू निश्चितच महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवे शिखर गाठून देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.






