एस.टी.डेपोतील संपर्क व्यवस्था तातडीने कार्यरत करा: प्रवाशांच्या सुविधेसाठी सुराज्य अभियानची ठाम मागणी

एस.टी.डेपोतील संपर्क व्यवस्था तातडीने कार्यरत करा: प्रवाशांच्या सुविधेसाठी सुराज्य अभियानची ठाम मागणी

एस.टी.महामंडळाच्या सेवा-विश्वासार्हते वर परिणाम: तातडीच्या कारवाईची मागणी

सोलापूर एस.टी. डेपो व नियंत्रण कक्षातील निष्क्रिय संपर्क क्रमांकांमुळे प्रवासी त्रस्त असून तातडीने व्यवस्था सुधारण्याची मागणी सुराज्य अभियानने केली आहे.

SolapurNews:सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज:एस.टी. प्रवाशांना बसची वेळ, विलंब, रद्दीकरण अथवा पुढील बसबाबत माहिती मिळावी यासाठी प्रत्येक डेपो व नियंत्रण कक्षामध्ये अधिकृत संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मात्र सोलापूर एस.टी. डेपो व नियंत्रण कक्षातील हे अधिकृत संपर्क क्रमांक अनेकदा अकार्यक्षम असल्याचे निदर्शनास येत असून, अनेक वेळा Out of Order असा संदेश मिळतो किंवा कॉलला कोणताही प्रतिसाद मिळत नाही. या निष्क्रिय संपर्क व्यवस्थेमुळे प्रवाशांना कोणताही विश्वासार्ह माहितीस्त्रोत उपलब्ध राहत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार तसेच आपत्कालीन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असून, ही बाब महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सेवा-विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्या या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्यात यावे, या मागणीसाठी सुराज्य अभियानच्या वतीने सोलापूर विभाग नियंत्रक नागेश जाधव (नियंत्रक विभाग) यांना निवेदन सादर करण्यात आले.

सुराज्य अभियानने ही समस्या सोलापूर विभाग नियंत्रक यांच्यासमोर ठोसपणे मांडली.यावेळी सुराज्य अभियानचे राजेंद्र पलनाटी,दत्तात्रय पलमारी,गोपीचंद व्हनमारे व किशोर जगताप उपस्थित होते.

सुराज्य अभियानच्या प्रमुख मागण्या :

सर्व एस.टी. डेपोतील अधिकृत लँडलाइन क्रमांक तातडीने दुरुस्त करून २४ तास कार्यरत ठेवावेत.
प्रत्येक डेपो व नियंत्रण कक्षासाठी एक स्थिर लँडलाइन व एक अधिकृत मोबाईल क्रमांक (बॅकअप) नियुक्त करावा.
सर्व कार्यरत संपर्क क्रमांकांची सत्यापित व अद्ययावत यादी MSRTC च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.
ही यादी डेपोतील सूचना फलकावर ठळकपणे प्रदर्शित करावी.
निष्क्रिय क्रमांक किंवा कॉलला प्रतिसाद न देणे ही सेवा-त्रुटी मानून संबंधित अधिकाऱ्यांची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी.
संपर्क प्रणालीच्या गुणवत्तेसाठी तिमाही पडताळणी (Quarterly Verification) सक्तीची करावी.
जिल्हानिहाय आपत्कालीन हेल्पलाइन २४ तास कार्यरत ठेवून तिची माहिती व्यापकपणे प्रसिद्ध करावी.
नियंत्रण कक्षांमध्ये कॉल रेकॉर्डिंग व मॉनिटरिंग प्रणाली लागू करावी.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि प्रवासी-हिताचे संरक्षण अत्यावश्यक असून, वरील मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सोलापूर जिल्ह्यात एस.टी.डेपो नियंत्रण प्रणालीच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा स्पष्ट इशारा सुराज्य अभियानच्यावतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Back To Top