भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलचा दिमाखदार पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलचा दिमाखदार पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न: समाजसेवेच्या नव्या पर्वाची घोषणा

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलचा पदग्रहण सोहळा दिमाखदार वातावरणात पार पडला असून समाजसेवेच्या नव्या पर्वाची घोषणा करण्यात आली.

Solapur news: सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/ ०१/२०२६: सोलापूर शहरातील सामाजिक कार्यात सातत्याने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रल या प्रतिष्ठित सामाजिक क्लबचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.हा सोहळा केवळ पदभार स्वीकृती पुरता मर्यादित न राहता, समाजसेवेच्या नव्या पर्वाची घोषणा करणारा ठरला.

याप्रसंगी क्लबच्या अध्यक्षपदी सुशील महिंद्रकर,सचिवपदी अभियंता सागर पुकाळे, खजिनदारपदी प्रभाकर कुसुमकर तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांनी विधिवत शपथ घेऊन आपली जबाबदारी स्वीकारली.उपस्थित मान्यवरांच्या टाळ्यांच्या गजरात नव्या कार्यकारिणीने समाजहितासाठी काम करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाज अध्यक्ष राजकुमार हंचाटे तसेच भावसार व्हिजन इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष सूत्रावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना सुशील महिंद्रकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,येणारे वर्ष हे केवळ कार्यक्रमांचे नसून परिणामकारक सामाजिक परिवर्तनाचे वर्ष ठरेल. शिक्षण, आरोग्य, अन्नदान, युवक प्रबोधन, महिला सक्षमीकरण तसेच गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिक व्यापक आणि प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.आपला क्लब हा केवळ संस्था नसून समाजासाठी काम करणारे एक कुटुंब आहे,असे नमूद करत त्यांनी बोर्ड ऑफ मेंबर्सच्या सहकार्याने समाजहिताचे नवे आदर्श निर्माण करण्याचा विश्वास व्यक्त केला.

राष्ट्रीय अध्यक्ष मनीष सूत्रावे यांनी भावसार व्हिजन इंडियाच्या कार्याचे कौतुक करत ही संघटना केवळ संस्था नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ असल्याचे सांगितले. सोलापूर सेंट्रल क्लब या चळवळीत मोलाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

समाज अध्यक्ष राजकुमार हंचाटे यांनीही क्लबच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करून नव्या पदाधिकाऱ्यां कडून समाजाला मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. आरती खमीतकर व सुधीर क्षीरसागर यांनी केले. सचिव अभियंता सागर पुकाळे यांनी आभार प्रदर्शन केले.

या दिमाखदार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अश्विन डोईजोडे, सुहास क्षीरसागर, श्रीकांत रंगदाळ, संजय पतंगे, राजेश झिंगाडे,लक्ष्मीकांत मुसळे,प्रभाकर जवळकर,दीपक आकुडे,हर्षद क्षीरसागर, दीपा उपरे, माधुरी लोकरे व पूनम पुकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

हा सोहळा म्हणजे केवळ पदग्रहण नव्हे, तर समाजसेवेच्या नव्या उमेदीचा, नव्या विचारांचा आणि नव्या जबाबदारीचा प्रारंभ ठरला असून, भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रल अधिक जोमाने समाजकार्यात झेप घेणार असल्याचा आशावाद या कार्यक्रमातून व्यक्त झाला.

Leave a Reply

Back To Top