विक्रमगडमधील महालक्ष्मी ज्वेलर्स चोरी प्रकरण उघडकीस; १४८.९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त, आरोपी अटकेत

विक्रमगडमधील महालक्ष्मी ज्वेलर्स चोरी प्रकरण उघडकीस; १४८.९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त,आरोपी अटकेत

विक्रमगड येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणत पालघर पोलिसांनी आरोपीस अटक करून १४८.९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

Palghar crime news:पालघर | ज्ञानप्रवाह न्यूज: विक्रमगड येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा पालघर पोलिसांनी यशस्वीरीत्या उघडकीस आणला असून या प्रकरणात एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. तसेच चोरीस गेलेले १४८.९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

विक्रमगड येथील महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक आदिनाथ महादेव कचरे (वय ३६ वर्षे, व्यवसाय – व्यापार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २४/०९/२०२५ रोजी दुकानात काम सुरू असताना अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात इसमाने दुकानातील कामगार इतर कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत काउंटर मधील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या चोरीत सुमारे १८ रुपये किंमतीचे सोन्याचे टॉप्सची प्लॅस्टिकची पिशवी चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले होते.

या प्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व विक्रमगड पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी मोहम्मद कलाम सलामुद्दीन अन्सारी (वय ४२ वर्षे, रा. भिवंडी, जि. ठाणे) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले १४८.९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.सदर आरोपीस न्यायालयाने दिनांक ३०/०९/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास विक्रमगड पोलीस ठाण्याचे पोउप निरीक्षक रविंद्र भागवत करीत आहेत.

पोलिस तपासात असे निष्पन्न झाले आहे की,अटक आरोपी हा बुलढाणा,ठाणे ग्रामीण,ठाणे शहर,पालघर,मीरा-भाईंदर- वसई-विरार पोलीस आयुक्तालय तसेच रायगड जिल्हा परिसरात सक्रिय असलेला सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध यापूर्वी एकूण १३ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख पालघर, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग अतिरीक्त कार्यभार जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर, सपोनि/अजित गोळे प्रभारी अधिकारी विक्रमगड पोलीस ठाणे, पोउपनि/रविंद्र वानखेडे, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/दिनेश गायकवाड,पोअंम/महेश अवतार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे.

पालघर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Back To Top