संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे सर्वेक्षण पथकांना निर्देश
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कडक सुरक्षा : जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून ईव्हीएम स्ट्राँग रूमची पाहणी
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी सर्वेक्षण पथकांची भेट घेऊन ईव्हीएम स्ट्राँग रूमची पाहणी केली.

कोल्हापूर | ज्ञानप्रवाह न्यूज: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय व सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी शहराच्या सीमेलगत करवीर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रमण मळा येथील ईव्हीएम स्ट्राँग रूमलाही त्यांनी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
स्थिर सर्वेक्षण पथकांच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी वाहन तपासणीची संपूर्ण कार्यपद्धती पाहिली.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी पथकांना दिले.जिल्ह्यात बेकायदेशीर रोख रक्कम, मद्यसाठा किंवा मतदारांना आमिष दाखवणारी कोणतीही वस्तू प्रवेश करू नये याची संपूर्ण जबाबदारी सर्वेक्षण पथकांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तपासणीदरम्यान सर्व प्रक्रिया कॅमेऱ्या समोर पार पडली पाहिजे आणि त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये,अशा सक्त सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रमण मळा येथील ईव्हीएम स्ट्राँग रूमची पाहणी करत त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली.
सशस्त्र दलाची तैनाती,सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कव्हरेज, लॉगबुकची नोंदणी यासह सर्व बाबींचा आढावा घेत ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास कडक पहारा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच पावसाळा व नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता स्ट्राँग रूममध्ये ओलावा निर्माण होऊ नये आणि अग्नीशमन यंत्रणा सदैव सज्ज ठेवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग व निवडणूक शाखेला देण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया निर्भय,निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार,अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार,परविक्षाधीन पोलीस अधीक्षक आरंक्षा यादव,निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील पवार, तेजस्विनी पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

