अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अटींवर संताप; ७ दिवसांत निर्णय न झाल्यास मोर्चाचा इशारा
मराठा तरुण आर्थिक कोंडीत; सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा
Pandhapur news: पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जाचक अटी, निधीअभावी अडथळे आणि रखडलेल्या व्याज परताव्यामुळे मराठा समाजातील नवउद्योजक तरुण गंभीर आर्थिक कोंडीत सापडल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाने केला आहे.

या पार्श्वभूमीवर महासंघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला तीव्र निवेदन देत प्रशासनाला इशारा देण्यात आला. जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
महासंघाने प्रशासनावर टीका करताना म्हटले आहे की,महामंडळाच्या नियमां नुसार LOI मंजुरीसाठी १५ दिवसांची मुदत असताना हेतुपुरस्सर विलंब केला जातो, ज्यामुळे बँक प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. तसेच महिला उद्योजकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स सक्ती, ७/१२ व ८अ उताऱ्यांची अट आणि वाहन कर्ज बंद करण्याचा निर्णय हे तरुणांना मागे खेचणारे ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
इतर महामंडळांच्या तुलनेत अण्णासाहेब पाटील महामंडळात उत्पन्नाच्या तीन पट कर्ज यांसारख्या अटी लादल्या जात असल्याने भेदभाव होत असल्याचा आरोपही करण्यात आला. याशिवाय, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला (LC) सर्व स्तरावर ग्राह्य धरावा, अशी मागणी करण्यात आली आहे.महासंघाने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालकांवर लाभार्थ्यांची अडवणूक केल्याचा आरोप करत त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली आहे.

येत्या ७ दिवसांत जाचक अटी रद्द करून रखडलेला व्याज परतावा जमा न झाल्यास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून एल्गार पुकारला जाईल,असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिन गंगथडे जिल्हा उपाध्यक्ष, गुरुदास गुटाळ जिल्हा सचिव, शिवाजी मोरे युवक जिल्हाध्यक्ष, हनुमंत कदम विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष, सचिन डोरले तालुका अध्यक्ष मंगळवेढा, अमोल सातपुते शहराध्यक्ष मंगळवेढा, अमोल पवार शहराध्यक्ष, शुभम ताटे युवक शहराध्यक्ष, शामराव साळुंखे शहर उपाध्यक्ष, पांडुरंग शिंदे शहर संघटक, नागेश गायकवाड शहर रिक्षा संघटना अध्यक्ष, नानासो शिंदे व्यापार व उद्योग आघाडी अध्यक्ष, शंकर गोवे, अजित लेंडवे, मालोजी शेंबडे, रोहित जाधव आदींसह महासंघाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

