एक्सप्रेस वेवर अवजड वाहनांच्या पार्किंगला बंदी; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
हायवे सुरक्षा वाढवण्यासाठी मोठा निर्णय: एक्सप्रेसवेवर पार्किंग थांबणार, प्रशासनाला कडक आदेश
नवी दिल्ली | प्रतिनिधी- देशातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत एक्सप्रेस वेवर अवजड वाहनांच्या पार्किंगवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. रस्ते सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये आणि अपघातांची संख्या कमी व्हावी, यासाठी न्यायालयाने ही भूमिका घेतली आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की, अपुरी पायाभूत सुविधा किंवा प्रशासनातील त्रुटींमुळे एक्सप्रेस वे धोकादायक बनू नयेत. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी तात्काळ उपाययोजना राबवाव्यात.केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), राज्य पोलीस आणि परिवहन विभागाला या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) तयार करून 60 दिवसांत अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
विशेष म्हणजे कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या राईट ऑफ वे क्षेत्रात ढाबे, दुकानं किंवा व्यावसायिक बांधकामांना परवानगी देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.आधीच असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच एक्सप्रेस वे च्या कडेला किंवा शोल्डरवर अवजड वाहनांची पार्किंग पूर्णतः बंद करण्यात येणार असून, यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
प्रशासनाने या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आधुनिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचा वापर करण्यावरही भर देण्यात आला आहे.

