आषाढी यात्रा 2026 : पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी हायटेक सुविधा ; सीईओ कुशल जैन यांचा दौरा
पालखी मार्गाची पाहणी ; वारकऱ्यांच्या सुविधा,पाणी व स्वच्छतेसाठी तत्पर राहा – सीईओ कुशल जैन
Pandhapur yatra : पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहावे, अशा सूचना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.

सीईओ कुशल जैन यांनी माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील विविध गावांना भेट देत पाहणी केली. यामध्ये धर्मपुरी, खुडूस, कारूंडे, सदाशिवनगर, पुरंदावडे, वेळापूर, वाखरी, भंडीशेगाव, पिराची कुरोली,महाळुंग, बोरगाव,अकलूज,माळीनगर या ठिकाणांचा समावेश होता.
या पाहणीदरम्यान वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष,रस्ते, स्वच्छतागृह,स्नानगृह,पालखी तळांची स्वच्छता आणि मुक्कामाच्या सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांना या सर्व सुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वाखरी पालखी तळापासून सुरू झालेल्या या दौऱ्यात जैन यांनी प्रत्यक्ष पायी फिरून मुक्काम व विश्रांती स्थळांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी अमोल जाधव, रघुनाथ पांढरे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
हायटेक आषाढी यात्रा: यंदाची आषाढी यात्रा अधिक आधुनिक व हायटेक करण्यावर प्रशासनाचा भर आहे. वारकऱ्यांसाठी जलद संवाद यंत्रणा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, तसेच निवारा केंद्रांमध्ये सुधारित सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची मदतही घेण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान गर्दी नियंत्रण व सुविधा सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने पूर्वनियोजन सुरू केले असून, सर्व यंत्रणांवर येणारा ताण कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

