पालघर स्फोटानंतर मोठी हालचाल; औद्योगिक सुरक्षा कडक करण्यासाठी डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी

पालघर फटाका स्फोटानंतर औद्योगिक सुरक्षेवर भर; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पालघर स्फोटानंतर मोठी हालचाल; औद्योगिक सुरक्षा कडक करण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

फटाका कारखाना स्फोटाचे पडसाद: राज्यात सर्व कारखान्यांची तपासणी करण्याची डॉ.गोऱ्हे यांची मागणी

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ एप्रिल २०२६ : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसई येथे २१ एप्रिल रोजी झालेल्या भीषण फटाका कारखाना स्फोटानंतर राज्यातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेत दोन आदिवासी कामगारांचा मृत्यू झाला असून चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

या घटनेची दखल घेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर करून औद्योगिक सुरक्षा मजबूत करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, कामगारमंत्री आकाश फुंडकर, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आणि पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनाही देण्यात आल्या आहेत.

डॉ निलम गोऱ्हे यांनी २३ एप्रिल रोजी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नमूद केले की, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (DISH) मध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने कारखान्यांची नियमित तपासणी होत नाही. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरणे आणि विभागाचे तांत्रिक सक्षमीकरण करणे गरजेचे आहे.

स्फोटक कारखान्यांची तातडीने पडताळणी

केंद्राच्या स्फोटक नियमांनुसार राज्यातील सर्व फटाका कारखान्यांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. स्फोटक पदार्थ हाताळणाऱ्या कामगारांना प्रशिक्षित व प्रमाणित करणे बंधनकारक करण्यासोबतच आदिवासी कामगारांसाठी विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

विशेष अग्निशमन केंद्राची मागणी

वाडा परिसरात रासायनिक आगींना तोंड देण्यासाठी विशेष अग्निशमन केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षित फायर रक्षक नेमण्याचे निर्देश देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

अनधिकृत कारखान्यांवर कडक नियंत्रण

अनधिकृत कारखान्यांवर नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस पाटील यांच्यात समन्वय वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. अधिकृत कारखान्यांची यादी शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, जेणेकरून बेकायदेशीर कारखान्यांवर प्रभावी कारवाई होईल.

कामगार सुरक्षा व विमा अनिवार्य

धोकादायक उद्योगांमध्ये कार्यरत सर्व कामगारांची १००% नोंदणी आणि विमा संरक्षण अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कामगारांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करणारी यंत्रणा उभारण्यावरही भर देण्यात आला आहे.

सखोल चौकशीची मागणी

कोनसई येथील दुर्घटनेची सखोल चौकशी करून प्रभावी न्याय निवाड्यासाठी सक्षम वकिलाची नियुक्ती करण्याची मागणीही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top