भावनिक राजकारणाचा चक्रव्यूह आंबेडकरी तरुण कधी भेदणार ?

भावनिक राजकारणाचा चक्रव्यूह आंबेडकरी तरुण कधी भेदणार ?

लेखक – हेमंत रणपिसे

निष्पक्ष सामाजिक चळवळींची समाजाला नेहमी गरज वाटत राहिली आहे. सामाजिक चळवळ समाजाला नेहमी पुढे घेऊन जाणारी ठरते. अशा निकोप सामाजिक चळवळींची देशालाही गरज आहे.मात्र सामाजिक चळवळींच्या आड काही हिंसक प्रवृत्ती आपला डाव साधत असतात. सामाजिक चळवळीचा बुरखा पांघरून काही कुटील राजकारणी भावनिक आंदोलनाची आग भडकवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजतात. मढ्यावरचे लोणी खाणाऱ्या राजकीय प्रवृत्तीने भावनिक राजकारणाचे चक्रव्यूह उभारलेले असते. भावनांच्या भरात वाहत असणारे सामान्य तरुण कार्यकर्ते कधी या भावनिक राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकले जातात ते त्यांना त्यांचं कळत नाही. महाराष्ट्रात मागील पन्नास वर्षांच्या कालखंडात आंबेडकरी तरुणांची परिस्थिती अशीच भावनिक राजकारणाच्या चक्रव्युहात अडकलेली आहे. आंबेडकरी तरुणांच्या तीन-चार पिढ्या या भावनिक राजकारणाच्या शिकार झालेल्या आहेत. मागील पन्नास वर्षात भावनिक राजकारणाच्या चक्रव्युहात अनेक आंबेडकरी तरुणांचे बळी गेलेले आहेत. नुकतेच परभणीत आंबेडकरी तरुणांचे तीव्र आंदोलन झाले.त्या आंदोलनात पोलीसी अत्याचारात बळी गेलेला सोमनाथ सूर्यवंशी हा शहीद भीमसैनिक भावनिक राजकारणाचा बळी ठरलेला आहे.त्यामुळे आंबेडकरी तरुणांची पिढीच्या पिढी बरबाद करणाऱ्या या भावनिक राजकारणाच्या चक्रव्युहाला आजचा आंबेडकरी तरुण भेदणार कधी हा प्रश्न आहे.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचा उभारलेला संघर्ष हा सर्व दलितांना नवजीवन देणारा ठरला आहे. संपूर्ण जगात मानवी हक्कांच्या चळवळी चे प्रेरणास्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर ठरले आहेत.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक आणि आर्थिक समतेचा विचार प्रेरणादायी ठरला आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित शोषित बहुजन समाजाला आई चे आणि वडिलांचे प्रेम देऊन घडविले आहे.दलित समाज हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपले दैवत मानत आहे .दलित समाजाचे परमोच्च श्रद्धास्थान ; स्वाभिमान अस्मिता आणि दलित समाजाचा प्राण अभिमान डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.दलित समाज डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपला प्राणप्रिय मुक्तिदाता मानतो.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी समग्र आंबेडकरी समाजाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.आंबेडकरी समाजाची ही प्रचंड तीव्रतेची भावना देशाने अनुभवली आहे.जेंव्हा जेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरां बद्दल अपमानास्पद घटना घडते तेंव्हा आंबेडकरी जनतेची ही तीव्र भावना अनेकदा ज्वालामुखी चा उद्रेक व्हावा तशी उसळून तप्त लाव्हारसासारखी बाहेर पडते.

आंबेडकरी समाजाची अस्मिता ही जागृत ज्वालामुखी आहे.या ज्वालामुखी चा उद्रेक झाला की त्यात सर्व बेचिराख होते हे माहीत असणारे राजकारणी आंबेडकरी चळवळीच्या या ज्वालामुखीचा आपल्या राजकीय हेतूसाठी बेमालूमपणे वापर करीत आले आहेत. आंबेडकरी चळवळीची ही बलाढ्य युवाशक्ती केवळ निषेध आंदोलनात गुंतवून ठेवल्यामुळे त्यांचे करियर घडण्याऐवजी बिघडले. अनेक वर्षे देशाच्या सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाने आंबेडकरी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले.त्यासाठी आंबेडकरी चळवळीने लढे उभारले. लढाऊ बाणा आणि संघर्ष हा आंबेडकरी चळवळीचा स्थायीभाव आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा हा जगात ऐतिहासिक लढा ठरला आहे.नामांतर लढा सदैव प्रेरणादायी लढा राहील.
त्यानंतर इंदुमिल स्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचे आंदोलन दीर्घकाळ चालले.त्यावेळी सत्तेत असणाऱ्या काँग्रेस च्या यूपीए सरकार ने इंदूमील ची जमीन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दिली नाही .इंदू मिल च्या स्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्हावे म्हणून झालेल्या आंदोलनानंतर देशात सत्तापरिवर्तन झाले.त्यापूर्वी 1997 रोजी घाटकोपर पूर्वेत माता रमाबाई आंबेडकरनगर मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीच्या आंदोलनाचा ज्वालमुखीसारखा विस्फोट झाला.त्यात पोलिसी गोळीबारात 11 भीमसैनिक शहीद झाले.त्या आंदोलनानंतर राज्यातील शिवसेना भाजप चे युती सरकार जाऊन महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले.काँग्रेस राष्ट्रवादी चे आघाडी सरकार राज्यात आले.नामांतर आंदोलनामुळे 14 जानेवारी 1994 रोजी नामांतर झाले.त्यानंतर झालेल्या निवडणूकीत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे राज्यातील काँग्रेस सरकार पराभूत होऊन शिवसेना भाजप चे युती सरकार निवडून आले.सन 1990 पासून जरी आपण पाहिले तरी भाजप आणि काँग्रेस यांचे आलटून पालटून सरकार राज्यात आणि देशात येत राहिले.सत्ता परिवर्तनसाठी प्रत्येक वेळी विरोधी पक्षाने आंबेडकरी समाजाच्या भावनिक आंदोलनाच्या ज्वालामुखी चा पुरेपूर वापर केला.त्यातून विरोधी पक्ष असणारे सत्ताधारी होत राहिले.आंबेडकरी तरुण मात्र भावनिक राजकारणाच्या चक्रव्युहात गुरफटत राहिला.भावनिक राजकारणाच्या विळख्यात आंबेडकरी चळवळीची युवापिढी अडकत राहिली आहे.आपल्या प्रगतीचा ,आपल्या करियर चा, आयुष्य घडविण्याचा,उच्च शिक्षण आणि व्यवसाय उद्योग आणि त्यासाठीचे कौशल्य मिळविण्याचा विचार मागे राहून आंबेडकरी तरुण भावनिक राजकारणाकडे सहज आकर्षित होत जातात.आजही अनेक असे प्रकार घडत आहेत.नुकताच संसदेत गृहमंत्री अमीत शहा यांनी काँग्रेस ने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही सन्मान केला नाही; केवळ स्वार्थासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव काँग्रेस घेत राहिली या अर्थाने आपले भाषण केले.ते मांडताना बोलण्याच्या भरात अमित शहा भलतेच बरळले आणि त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध झाला. अमित शहा यांच्या पूर्ण भाषणात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी गौरव केला.काँग्रेसच्या खोट्या आंबेडकरप्रेमाचा बुरखा त्यांनी फाडला पण अमित शहा यांच्या एका चुकलेल्या वाक्याचा धागा पकडून त्यांचा देशभर निषेध झाला.यात काँग्रेस पक्षाने आंबेडकरी तरुणांच्या भावनिकतेचा बेमालूमपणे वापर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विधिमंडळ सभागृहात नक्षलवादाचा बीमोड करण्याबाबत भूमिका मांडली त्यात त्यांच्या भाषणाला एडीट करून त्यांच्याबद्दल चुकीचा प्रचार करण्याचा प्रयत्न समाजमाध्यमांत झाला. आंबेडकरी तरुणांच्या भावना भडकविण्यासाठी असे काटछाट केलेले व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल केले जातात.अशा चित्रफितींची सत्यता पडताळून भूमिका घेण्याची प्रज्ञा आंबेडकरी तरुणांनी दाखवली पाहिजे.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेऊन समाजमाध्यमां तील ही अपप्रवृत्ती जेरबंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप संविधान बदलणार नाही हे घशाला कोरड पडेपर्यंत भाजप नेते सांगत असताना काँग्रेस ने मात्र संविधान बदलण्याचा धोका असल्याची खोटी अफवा पसरवण्यात यश मिळविले आहे.संविधान बदलणार आणि संविधान बदलणार नाही या दोन भागात विभागलेल्या विरोधी आणि सत्ताधारी पक्षात एक बाब समान आहे ती म्हणजे आंबेडकरी तरुणांना भावनिकदृष्ट्या साद घालणे.आंबेडकरी तरुणांच्या भावनिक आंदोलनाला जागे करून आम्ही किती आंबेडकरप्रेमी आहोत हे ठसविण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष करीत असतात.त्यात सर्वच राजकीय पक्ष आलेत.भावनिक आंदोलनाला हात घालून आंबेडकरी समाजाचा विश्वास जिंकणारे पक्ष सत्तेत येतात.त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना जिंकण्यासाठी आम्ही किती डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त आहोत हे सांगण्याचा भाजप आणि काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष यांच्यात सतत स्पर्धा लागलेली आहे .
या स्पर्धेत जिंकणारे सत्तेत पोहोचतात मात्र आंबेडकरी तरुणांच्या हाती काय लागते ? भावनिक आंदोलनात झालेल्या केसेस त्यातून उद्ध्वस्त आयुष्य नशिबी येते .रिकाम्या हातात आपले झेंडे देणारे पक्ष खूप आहेत.मात्र या रिकाम्या हातांना रोजगार देणारे;उद्योग व्यवसाय देणारे ; आंबेडकरी तरुणांना भवनिक आंदोलनातून बाहेर काढून प्रगतीचा विकासाचा कौशल्याचा मार्ग दाखवणारे रिकामी हातांना उद्योग देणारेच आंबेडकरी तरुणांचे खरे नेते होऊ शकतील.

प्रस्थापित काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष आंबेडकरी समाजाला आम्ही किती डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करणारे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.या त्यांच्या भूमिकेमागे सत्तेचे सिंहासन मिळविण्याचा स्वार्थ आहे. हे ओळखून आंबेडकरी तरुणांनी आपल्या आयुष्याचा, करियरचा आधी विचार केला पाहिजे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तरुणांना संदेश दिला आहे की आधी विद्यार्जन करा.शिकून सवरून तयार व्हा. स्वतःच्या कुटुंबाच्या भरणपोषणा ची तरतूद करा.तयार होऊन राजकीय चळवळीत उतरा! हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आंबेडकरी तरुणांनी मनी बाळगून तयार झाले पाहिजे.

अभ्यास नसणारे; वैचारिक दृष्ट्या बैठक मजबूत नसणारे तरुण भावनिक राजकारणात सहज अडकले जातात.या देशात आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे .त्यामुळे आंबेडकरी तरुणांचा बुद्धिभेद करण्याची स्पर्धा राजकारणात सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून भावनिक आंदोलनाची आग भडकवली जात आहे. त्यात राजकीय पक्षांना सत्ता मिळवायचे ध्येय पूर्ण करायचे असते.मात्र भावनिक आंदोलनात उतरणाऱ्या आंबेडकरी तरुणांना काय मिळते.आज त्यांचे आयुष्य बरबाद होते.केसेस होतात.करियर संपते.नुकताच परभणीत संविधान विटंबना प्रकरणी झालेल्या निषेध आंदोलनात आंबेडकरी महिलांना आणि तरुणांना पोलिसी अत्याचाराला बळी पडावे लागले. पोलिसी अत्याचाराचा बळी शहीद सोमनाथ सुर्यवंशी हा उच्च शिक्षणाकडे झेप घेणारा दलित तरुण या भावनिक राजकारणाचा बळी ठरला आहे. त्यामुळे आजही भावनिक राजकारणाच्या विळख्यात अडकलेल्या आंबेडकरी तरुणांना बाहेर काढून विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा निर्धार केला पाहिजे.आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक घरात उद्योग व्यवसाय उच्च शिक्षण घेऊन समृध्द होणारी पिढी असेल तर राजकारणात ही आंबेडकरी चळवळ सत्तेचे सिंहासन जिंकू शकेल.त्यासाठी संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात आंबेडकरी तरुणांनी भावनीक राजकरणाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा निर्धार केला पाहिजे.

हेमंत रणपिसे

Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading