पटवर्धन कुरोली परिसरातील वारंवार खंडित वीजपुरवठ्या विरोधात नागरिक आक्रमक
पंचायत समिती सदस्य प्रमिला सोमनाथ झांबरे यांचे महावितरणला निवेदन
दिवसातून केवळ दोन तास वीजपुरवठा; पटवर्धन कुरोलीतील शेतकरी,विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली (जुने नांदरे, नवीन नांदरे, देवडे व पटवर्धन कुरोली खेडभोसे फिडर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती सदस्य प्रमिला सोमनाथ झांबरे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, परिसरात दिवसातून अत्यल्प वेळ वीजपुरवठा मिळत असून त्यामध्येही वारंवार खंड पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच घरगुती ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सततच्या वीज खंडिततेमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून शेती व व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे महावितरणने तांत्रिक अडचणींची तातडीने दखल घेऊन परिसरातील वीजपुरवठा नियमित आणि सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य सोमनाथ झांबरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल सांवत,अरविंद डावरे, अनिल जवळेकर,भजनदास नाईकनवरे, रणजित उपासे तसेच वायरमन श्री.घोडके उपस्थित होते.

