विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला योग्य मार्गदर्शनाची जोड; पंढरपूर-मंगळवेढ्यात 625 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा
आमदार समाधान आवताडे यांच्या पुढाकारातून गुणवंतांचा सन्मान; अविनाश भारती यांचे प्रेरणादायी करिअर मार्गदर्शन
पंढरपूर | मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज- विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की समाजाच्या प्रगतीचा मार्ग सुकर होतो असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते कीर्तनकार व कवी अविनाश भारती यांनी व्यक्त केले आहे. कै महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन या कार्यक्रम पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते श्रीराम मंगल कार्यालय पंढरपूर येथे त्याचबरोबर जोगेश्वरी मंगल कार्यालय बायपास रोड मंगळवेढा येथे इयत्ता दहावी मधील ३२५ व बारावी मधील ३१० अशा एकूण ६२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून भारती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी तसेच करिअरच्या नव्या संधींबाबत योग्य दिशा मिळावी या उद्देशाने व्याख्याते अविनाश भारती यांचे विशेष करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि पालकांच्या योगदानाचे विशेष कौतुक होत असते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थिनींशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा विशेष आनंद झाला. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य दिशा, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते भविष्यात मोठे यश संपादन करू शकतात, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करत असताना प्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती म्हणाले की,समाजातील गुणवंतांचा गौरव करणे म्हणजे केवळ व्यक्तींचा सन्मान नव्हे, तर परिश्रम, जिद्द आणि यशाचा गौरव होय. अशा उपक्रमांमुळे युवक-युवतींना प्रेरणा मिळते, समाजात सकारात्मक विचार रुजतात आणि पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण होतात.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्व यांचा समन्वय साधून जीवनात मोठी उद्दिष्टे निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षण हे केवळ करिअर घडविण्याचे साधन नसून समाज आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची शक्ती आहे.आज सन्मानित झालेले गुणवंत विद्यार्थी हे उद्याचे शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, शिक्षक आणि समाजाचे नेतृत्व करणारे जबाबदार नागरिक आहेत. त्यांच्या यशामागील पालकांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित करण्यात आले. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव आणि गुणवत्तेचा सन्मान हीच प्रगतीशील समाजाची खरी ओळख आहे.अशा उपक्रमांमधून नव्या पिढीला प्रेरणा मिळते,आत्मविश्वास वाढतो आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची ऊर्जा प्राप्त होते असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी युटोपियन शुगर चे चेअरमन उमेश परिचारक, बार्शीचे विजय राऊत,माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपनगराध्यक्ष प्रा.येताळा भगत, पंढरपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे,माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, नगरसेवक किरण घाडगे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर,रमेश भांजे, उद्योजक हणमंत दुधाळ, उद्योजक जनार्धन शिवशरण, यशोदा पतसंस्थेचे चेअरमन नीला आटकळे, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉ शुभम आगावणे, मंगळवेढा पंचायत सभापती दिपाली ताड, उपसभापती अर्जुन मल्लाळे, प्रतिष्ठानचे सचिव सरोज काझी, कार्याध्यक्ष आझाद दारूवाले, संचालक दादासाहेब ओमणे, संचालक संजय माळी, त्याचबरोबर कै.महादेवराव बाबुराव अवताडे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, नगरपरिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच अनेक गुणवंत विद्यार्थी पालक मार्गदर्शक शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






