यमाई तलावालगतची ३ हेक्टरहून अधिक शासन जमीन विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीकडे हस्तांतरित; पर्यटन व गोसंवर्धन केंद्राला चालना

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूल मंत्री व पालकमंत्र्यांचे मंदिर समितीकडून आभार व्यक्त

पंढरपूरच्या विकासाला नवे बळ; यमाई तलाव परिसरात अत्याधुनिक गोमाता संवर्धन व पर्यटन केंद्र उभारणार

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ जून : पंढरपूर शहरातील गट क्रमांक १६१ मधील यमाई तलावालगत असलेली सुमारे ३ हेक्टर १२ आर क्षेत्रफळाची शासन मालकीची जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्याकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास शासनाने विविध अटी व शर्तींसह दि. १६ जून रोजी मंजुरी दिल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

याबाबत दि.२८ एप्रिल रोजी मंत्रालय मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सदर जमीन मंदिर समितीकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी तात्काळ शासनास प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त पुणे यांच्यामार्फत दि.७ मे रोजी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

सदर जागा मंदिर समितीस प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक पर्यटन (सहल) केंद्र तसेच गोमाता जतन व संवर्धन केंद्र उभारण्याचा मानस आहे.या प्रकल्पासाठी मंदिर समितीने प्रारूप आराखडा तयार केला असून हे काम मंदिर समितीच्या निधीतून करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत या जागेवर मंदिर समितीची गोशाळा कार्यरत असून, येथे सुमारे २५० लहान-मोठ्या देशी गाई व वासरांचे संगोपन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले जात आहे.गोवंशासाठी स्वच्छ व प्रशस्त निवारा, नियमित पशुवैद्यकीय तपासणी, पौष्टिक चारा तसेच पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. गोशाळेतून प्राप्त होणाऱ्या दुधाचा उपयोग श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्योपचार व धार्मिक विधींसाठी केला जातो. याशिवाय गोसेवेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व जपण्याचे आणि भाविकांमध्ये गोसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचे कार्यही मंदिर समितीमार्फत केले जाणार आहे.

यमाई तलावालगतची ही जागा मंदिर समितीकडे हस्तांतरित झाल्यानंतर येथे पर्यावरणपूरक व अत्याधुनिक सुविधांनी युक्त आदर्श गोमाता जतन व संवर्धन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये देशी गोवंश संवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, चारा विकास, गोआधारित उपक्रम तसेच भाविकांना गोसेवेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल अशा विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे पंढरपूरमध्ये धार्मिक पर्यटनासोबतच गोसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे.

दि.२८ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीस ऑनलाइन पद्धतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी,मंदिर समिती सदस्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच प्रत्यक्ष उपस्थितीत मंदिर समिती सदस्या ॲड.माधवी निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

या महत्त्वपूर्ण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्यावतीने शतशः आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

शासनाच्या या ऐतिहासिक निर्णया निमित्त आज सायंकाळी गोशाळा परिसरात गोमातेचे पूजन करण्यात आले.यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, विभाग प्रमुख अतुल बक्षी, राजेंद्र सुभेदार, सावता हजारे, योगराज बाणेकर, शंकर मदने, यशवंत गुरव, समीर ढोबळे तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Back To Top