पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भव्य भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण
आषाढी वारी 2026 : वारकऱ्यांसाठी हक्काचे भक्तनिवास सुरू; सुनेत्रा पवार यांनी मांडला पंढरपूर विकासाचा रोडमॅप

Pandhapur aashadhi :पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज,दि.४ जुलै २०२६: पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासा च्या नूतन वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील,आमदार समाधान आवताडे,आमदार राजू खरे,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प.कानोबा महाराज मोरे, यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी हक्काचे घर
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल- रुक्मिणी च्या चरणी नतमस्तक होते.आजचा दिवस मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील हजारो ग्रामस्थ- भाविकांसाठी आनंदाचा व भाग्याचा आहे.आषाढी एकादशी च्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळाली हे भाग्यच.
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे आपुले, तोचि साधू ओळखावा या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत त्या म्हणाल्या, ऊन- पावसाची पर्वा न करता पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व वारकरी मंडळांनी ही वास्तू उभारली हे कौतुकास्पद आहे.

मंचरची ऐतिहासिक परंपरा व वास्तूची उपयुक्तता
मंचरला पांडवकालीन बारव,तपेश्वर भूमीची आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. संत तुकाराम महाराजांनी ‘मंचरी’ हा हस्तलिखित ग्रंथ मंचर येथे लिहिला, त्यात ५३७ अभंग आहेत.ही मंचरकरांसाठी अभिमानाची बाब आहे,असे पवार यांनी नमूद केले.
वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला हक्काचा निवारा मिळावा यासाठी ही सुसज्ज धर्मशाळा उपयोगी ठरेल. ही इमारत भक्ती व सेवेचे केंद्र बनेल. मंडळाचे संस्थापक ह.भ.प. मारुती धोंडेबा मोर्डे ऊर्फ अण्णा गुरुजींनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. ‘पूर्ण केला मनोरथ’ या उक्तीप्रमाणे आंबेगाव-मंचरच्या ग्रामस्थांचे पंढरपुरात हक्काचे घर झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
दानशूरांचे ऋण व पंढरपूर विकास आराखडा
गोवर्धन समुदायाचे देवेंद्र शहा यांच्यासह अनेक दानशूरांनी प्रकल्पासाठी मोठी मदत केली, त्यांचे ऋण उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
दादांना पंढरपूर जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ बनवायचे होते. पालखी महामार्ग हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांची अनेक स्वप्ने पूर्ण झाली, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्याला राज्यस्तरीय शिखर समितीने मान्यता दिली आहे. सुमारे ४,००० कोटींच्या या आराखड्यातून पुरातन मंदिर-मठांचे जतन, भव्य कॉरिडॉर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा घाट सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ, व्यापारी संकुल, रस्ते, पूल व पालखी तळांचा विकास होणार आहे.

वारीसाठी सुविधा
१२ जूनला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात १० दिंडी प्रमुख व मंदिर समिती अध्यक्षांची बैठक घेऊन सुरक्षित सुविधा देण्याचे निर्देश दिले.दिवेघाट-हडपसर व बारामती- इंदापूर मार्गाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होईल. वारीसाठी एसटी महामंडळाच्या साडेपाच हजार बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
मी तेर या संत गोरा कुंभारांच्या गावची आहे.दर एकादशीला आमच्याकडेही वारी, पालखी, भजन-कीर्तन असते. लहानपणापासून माऊलींशी वेगळे नाते आहे. दादांचे शब्द खरे करून दाखवणे ही माझी जबाबदारी आहे, असे सांगत एलनीनोच्या संकटातून महाराष्ट्राला मुक्त करण्याची प्रार्थना त्यांनी विठुरायाचरणी केली.
कार्यक्रमास पंढरपूर व मंचर नगरपालिकेचे नगरसेवक, सेवा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष सुभाष थोरात, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शासकीय अधिकारी, पत्रकार व हजारो वारकरी उपस्थित होते.

