एमआयडीसी च्या विरोधामागे सूत्रधार कोण ते शोधले पाहिजे – मनसे नेते दिलीप धोत्रे

  • एमआयडीसी ला विरोध : यामागे कोण सूत्रधार आहे ते शोधले पाहिजे त्या लोकांना पंढरपूरची जनता धडा शिकवेल – मनसे नेते दिलीप धोत्रे
  • आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश
  • केवळ राजकीय श्रेयासाठी विरोध होत असल्याचा किरण घाडगे यांचा आरोप

     पंढरपूर / प्रतिनिधी :- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा येथील तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी मागील अनेक दिवसापासून पाठपुरावा करून पंढरपूर तालुक्यासाठी MIDC ची स्थापना लवकरच होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवले होते. त्या साठी गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनामध्ये अधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळी यांच्या समवेत सविस्तर चर्चाही झाली .

     या बैठकीमध्ये पंढरपूर तालुक्यातील MIDC साठी लागणाऱ्या जागेसाठी आमदार समाधान आवताडे यांनी कासेगाव, अनवली आणि रांझणी परिसरातील जागेबाबतची माहिती या बैठकीत दिली होती.

        याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी या बैठकीत तत्काळ सूचना दिल्या आणि सोमवारी दिनांक १९ सप्टेंबर रोजी वरील सुचविण्यात आलेल्या जागेची पाहणी करण्यासाठी पथक आले.या बैठकीत ठरल्याप्रमाणे पुढील कार्यवाहीसाठी तत्काळ सुरवातही झाली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या सततच्या पाठपुराव्याला नक्की यश मिळणार असे वाटत असतानाच कासेगाव भागातील शेतकऱ्यांनी आमचा MIDC ला विरोध असून कासेगाव हद्दीतील शेतकर्यांना विश्वासात न घेता जागेची पाहणी केली आहे असा आरोप केला आहे.

    आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या समवेत शासकिय अधिकार्यांनी MIDC एमआयडीसी साठी कासेगाव भागातील जागेची पाहणी केली आहे.

     पंढरपूर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी असलेले रस्ते ,पाणी, वीज, जमीन आणि रेल्वे स्टेशन याबरोबरच पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो लोकांची वर्दळ यामुळे MIDC यापूर्वीच होणे अपेक्षित होते.परंतु या विषयावर केवळ निवडणुकी पुरते चर्चा होत होती, त्यांनतर मात्र यासाठी प्रयत्न झाले नसल्याने MIDC होऊ शकली नव्हती. या सेना भाजपा सरकारच्या कार्यकाळात पंढरपूर ची MIDC ही नक्की करून दाखवणार असा शब्द आमदार समाधान आवताडे यांनी दिला होता,त्या दृष्टीने हालचालींना ही वेग आला असतानाच हा विरोध सुरु झाला आहे. MIDC मुळे कासेगाव भागातील जमिनीवर परिणाम होईल आणि रोजगारीवरही परिणाम होणार आहे असा त्यांचा आरोप होता.जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

   तर दुसरीकडे आज मनसेचे नेते दिलीप धोत्रे, कोळी महासंघाचे नेते अरुण कोळी,माजी नगरसेवक व संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे , राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे, मनसे चे शशिकांत पाटील, संतोष कवडे, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, नागेश इंगोले पदाधिकारी किरण घाडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन MIDC ला तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन करताना सांगितले की, आज आपल्या तालुक्या तील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी शहरं गाठावी लागत आहेत.आता पूर्वीप्रमाणे प्रदूषण करणारी मशिनरी नसून पाण्याचेही फॅक्टरीच्या ठिकाणीच पाणी रिसायक्लिंग करून वापरण्यात येणार आहे.त्यामुळे कसल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसून रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.

पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी होत असताना तिला विरोध करणे दुर्दैवी आहे. या विरोध करणाऱ्यामागे कोण सूत्रधार आहेत हे शोधले पाहिजे. या पापाची फळे त्यांना भोगावी लागतील. पंढरपूरची जनता त्या लोकांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला असून पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी होणारच आहे त्यासाठी वाटल्यास रस्त्यावर आंदोलनासाठी उतरू असेही मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

   आता फक्त जागेची पाहणी करण्यासाठी पथक मुंबईहून आले होते.जागा नक्की केलेली नसताना एवढा विरोध कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून करण्यात येतोय याचा जनतेने करावा कारण यापूर्वीही बाभुळगाव येथील नेत्याने आणि आता कासेगाव येथील नेत्याने केलेला विरोध यावरून या विरोधा पाठीमागे कोण आहे हे लक्षात येत आहे.

    कासेगाव येथील काही राजकीय मंडळींनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कासेगाव येथे एम आय डी सी होउ देणार नाही असे जाहीर केले आहे.त्यामुळे मागील आठ दिवसांपासून तालुक्यात एम आय डी सी होणार म्हणून निर्माण झालेल्या युवकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.

पुण्या मुंबईला जाऊन मिळेल तो रोजगार आपल्या कडील बेरोजगारी करतात अशी परिस्थिती असल्याने आ.समाधान अवताडे, मी स्वतः तालुक्यात एम आय डी सी व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहोत. या एमआयडीसी चे श्रेय आपल्याला मिळत नाही म्हणून कुणी याला विरोध करीत असेल तर ते दुर्दैवी आहे. या विरोधा पाठीमागे एमआयडीसी झाली तर त्याचे श्रेय कोणाला मिळणार यासाठी तर नसेल ना ? नेमके काय हे सर्वसामान्य नागरिकांना कळणे गरजेचे आहे असे मनसे राज्य नेते दिलीप धोत्रे म्हणाले.

   यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांनी सांगितले की,मुळात या एमआयडीसी साठी ज्या जमिनींचा प्रस्ताव दिला आहे ती जमीन खाजगी नाही,एकाही शेतकऱ्याची जमीन जाणार नाही, समजा कुणी दिलीच तर त्यांना बाजारभावाच्या चौपट दर मिळणार आहे, शिवाय एमआयडीसी मध्ये त्याने दिलेल्या जमिनीच्या बदल्यात त्याला उद्योगा साठी १० टक्के जागा देण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. केवळ राजकीय श्रेयासाठी विरोध होत असल्याचा आरोप घाडगे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: