डान्सबारविरोधी कायदा अधिक प्रभावी करा; गुप्त बारचे सर्वेक्षण आवश्यक : डॉ.नीलम गोऱ्हे

डान्सबारविरोधी कायदा अधिक प्रभावी करा; गुप्त बारचे सर्वेक्षण आवश्यक : डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांचे शोषण,अल्पवयीन मुलींची तस्करी रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी; डॉ.नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत भूमिका

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८ जुलै २०२६-महाराष्ट्रातील डान्सबार विरोधी कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याची गरज असून, राज्यभर गुप्तपणे सुरू असलेल्या डान्सबारचे सखोल सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली. महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे व मद्यपान कक्ष (बार रूम) यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासंदर्भातील (सुधारणा) विधेयक, २०२६ वरील चर्चेदरम्यान त्यांनी ही भूमिका मांडली.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, २००५-०६ मध्ये डान्सबारविरोधी कायदा मंजूर होत असताना त्यांनी त्याला पाठिंबा दिला होता. या कायद्यामुळे डान्सबारचे प्रमाण कमी झाले असले, तरी अनेक ठिकाणी गुप्त किंवा खासगी स्वरूपात असे बार सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यभर वास्तवस्थिती जाणून घेण्यासाठी व्यापक सर्वेक्षणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुधारणा विधेयकात ऑर्केस्ट्राचाही समावेश करण्यात आल्याचे स्वागत करत त्यांनी महिलांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण रोखणे, अल्पवयीन मुलींची तस्करी थांबवणे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या साखळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अनेक ठिकाणी महिलांना वेट्रेस म्हणून दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांचे शोषण होत असल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी पोलिसांबरोबरच संगीत, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि अश्लील सादरीकरण यामधील स्पष्ट फरक ओळखण्यासाठी तज्ज्ञांची मदत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी डान्सबार विरोधी कायद्याला न्यायालयीन आव्हाने आणि प्रभावी लॉबींचा सामना करावा लागला असला, तरी महिलांच्या सन्मानाचे रक्षण आणि समाजहितासाठी हा कायदा अधिक कठोरपणे अंमलात आणणे गरजेचे असल्याचे ठामपणे सांगितले.

चर्चेच्या शेवटी त्यांनी सभागृहातील सदस्यांना महिलांच्या सन्मानाशी संबंधित विषयांवर संवेदनशीलता आणि जबाबदारीने चर्चा करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Back To Top