संगमनेरला स्वतंत्र RTO मिळण्याच्या हालचालींना वेग; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद

संगमनेरला स्वतंत्र RTO मिळण्याच्या हालचालींना वेग; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद

संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रस्तावाला गती;परिवहन मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०७/ २०२६ – संगमनेर, अकोले आणि परिसरातील नागरिकांना परिवहन सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्याच्या मागणीला गती मिळाली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन संगमनेरसाठी स्वतंत्र RTO मंजूर करण्याची मागणी केली. यावर परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना नव्या शासन निकषांनुसार प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी-विक्री होते. मात्र, वाहन नोंदणी, वाहन परवाने, कर भरणा आणि इतर परिवहन सेवांसाठी संगमनेर, अकोले तसेच परिसरातील नागरिकांना दूरच्या RTO कार्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असल्याची बाब आमदार सत्यजीत तांबे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

या मागणीचा आमदार सत्यजीत तांबे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. २४ मार्च २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतंत्र RTO कार्यालयाची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी स्वतंत्र कॅम्प कार्यालयास मंजुरी मिळाली होती. मात्र ते अद्याप सुरू झाले नसल्याने कॅम्प कार्यालय तातडीने कार्यान्वित करावे आणि पुढे स्वतंत्र RTO मंजूर करावे, अशी मागणीही करण्यात आली होती.

त्यानंतर जुलै २०२५ च्या पावसाळी अधिवेशनातही विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. आता नव्या शासन अध्यादेशातील निकषांनुसार संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रस्ताव पुढे सरकल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले की, संगमनेर, अकोले आणि परिसरातील लाखो नागरिकांना अधिक कार्यक्षम, सुलभ आणि जवळच्या ठिकाणी परिवहन सेवा उपलब्ध होईपर्यंत हा पाठपुरावा सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Back To Top