मुंबईकरांचा ‘मोनो’ प्रवास होणार जलद; स्वदेशी मोनोरेल येणार वर्षभरात


म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गाड्यांच्या अनुपलब्धतेमुळे कमी फेऱ्या आणि परिणामी प्रवाशांची नाराजी यामुळे अडगळीत पडलेल्या मोनोरेलकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) १० मोनोगाड्या बांधणीचा मार्ग आता खुला झाला आहे. मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल होणार आहे.

गाडी बांधणीबाबत ‘निविदा मूल्यमापन प्रक्रियेविरोधात’ टिटाग्राफ कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर संबंधित कंपनीला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे एमएमआरडीएला मोनोरेल गाडी बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मुभा कायम राहिली आहे.

मोनोरेलसाठी सध्या प्रवाशांना साधारणपणे २५ ते ३० मिनिटे वाट पाहावी लागते. गाड्या उपलब्ध नसल्याने फेऱ्या वाढवण्यास प्रचंड मर्यादा आहेत. आता स्वदेशी बनावटीच्या दहा गाड्या दाखल झाल्यानंतर एकूण १७ गाड्यांच्या माध्यमातून प्रति ४ ते ६ मिनिटाला एक फेरी उपलब्ध होईल, असे एमएमआरडीएतील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेधा कंपनीला १० मोनोरेल गाड्या बांधण्यासाठी ५८९ कोटी ९५ लाखांचे कंत्राट देण्यात आले असून मुंबई मोनोरेल प्रकल्पासाठी डिझाइन आणि तांत्रिक बाबींकरिता सल्लागार नियुक्तीसाठी खुल्या स्वरूपात निविदादेखील मागवल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

‘संबंधित कंपनीने मोनोरेल गाड्या बांधून त्याच ठिकाणी त्यांची चाचणी करावी, अशी महत्त्वाची अट या कंत्राटात आहे. यामुळे मुंबईत दाखल झाल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची गरज भासणार नाही. त्या थेट प्रवासी सेवेत दाखल करता येतील. गाडी बांधणी आणि चाचणी ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने साधारणपणे वर्षभरात पहिली देशी बनावटीची मोनोगाडी मुंबईत दाखल होईल. त्यानंतर टप्याटप्याने उर्वरित सर्व गाड्या ताफ्यात येतील’, असे एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले.

भविष्यात मेट्रो रेल्वेचीही जोडणी

मुंबईतील संत गाडगे महाराज चौक-वडाळा-चेंबूर दरम्यान १९.५४ किलोमीटर मार्गावर मोनोरेल धावत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असा हा प्रकल्प मानला जातो. मोनोरेल टिकवण्यासाठी भविष्यात या मार्गाला मेट्रो मार्ग जोडण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: