आम्ही सर्व संचालकांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवुन निधी उपलब्ध करत संघर्षातून मार्ग काढत आहोत-चेअरमन कल्याणराव काळे

सहकार शिरोमणी चा 22 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न
    चंद्रभागानगर ,भाळवणी /नागेश आदापूरे, 11/10/2021 :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी ता. पंढरपूर चा सन 2021-22 चा 22 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सहकार शिरोमणी कारखान्याचे जेष्ठ् सभासद रेवणसिध्द पुजारी, रा.विटे यांचे अध्यक्षतेखाली व वसंतदादा मेडिकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे व त्यांच्या सुविद्यपत्नी डॉ.सौ. जयश्रीताई शिनगारे या उभयतांच्या हस्ते आज 11 ऑक्टोंबर रोजी संपन्न् झाला. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे, संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित होते. 

होमहवन पुजा कारखान्याचे जेष्ठ तोडणी वाहतुक ठेकेदार सुभाष ढोबळे, उंबरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रेखाताई ढोबळे याचे हस्ते करण्यात आली.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

 या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले,लखीमपुरी खिरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज संपुर्ण महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. त्यात आम्हीही सहभागी आहोत. परंतु पुर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळे हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला आहे . मागील दोन-तीन सिझनमध्ये जुनी मशिनरी, को-जनरेशन प्रकल्प मशिनरी आधुनिकीकरण तसेच साखरेच्या दरातील चढ उतार यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत होता. बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नव्हते. परंतु ज्याप्रमाणे स्व.दादांनी अनेक अडचणीतुन भाळवणीच्या माळरानावर या कारखान्याची निर्मिती केली, त्यांचा वारसा जपत कारखान्यास पुर्व गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही सर्व संचालकांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवुन निधी उपलब्ध केला असून संघर्ष करत मार्ग काढत आहोत. चालु गळीत हंगामात सुमारे 5.50 लाख मे.टनापेक्षा जास्त गळीत करण्याचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने मशिनरी देखभाल दुरुस्तीची सर्व कामे करुन घेण्यात आली आहेत.240 ट्रक ट्रॅक्टर, 227 बैलगाडी, 110 ट्रॅक्टर बैलगाडी करार करुन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.मागील सालातील ऊस उत्पादक शेतकऱ्याची ऊस बिलाची 75 टक्के रक्कम अदा केली असून, लवकरच थकहमी मिळाल्यामुळे उर्वरीत बिलेही देण्यात येणार असल्याचे सांगुन आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.सुधिर शिवाजी शिनगारे यांनी कारखाना उभारणीच्या काळापासून स्व.दादांनी कारखाना उभा करण्यासाठी केलेला संघर्ष आणि गळीत हंगाम चालु करण्यासाठी चेअरमन कल्याणराव काळे करीत असलेले अहोरात्र कष्ट समक्ष पहात असल्याचे सांगुन, स्व.दादांच्या आठवणीस उजाळा देवुन, बॉयलर अग्निप्रदिपन आम्हा उभयतांचे हस्ते करण्याची संधी मिळाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या.

 यावेळी कारखान्याने नुतन कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी कारखान्यास अविरत ऊस गळीतास देणारे जेष्ठ सभासद कार्यक्रमाचे अध्यक्ष रेवणसिध्द् पुजारी यांची आणि तोडणी वाहतुक ठेकेदार सुभाष ढोबळे यांची उपस्थितांना ओळख करुन देवुन, चालु गळीत हंगामामध्ये कारखाना पुर्ण क्षमतेने चालवुन गळीताचे 5.50 लाख पेक्षा जास्त्त गळीत करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी जबाबदारीने काम करण्यास सांगितले. तसेच सर्व शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्यास गळीतास देवुन कारखान्याची आर्थिक स्थिती बळकट करणेकामी सहकार्य करावे अशी विनंती केली. संचालक सुधाकर कवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सुत्रसंचलन समाधान काळे यांनी केले.

यावेळी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे,प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, माजी चेअरमन महादेव देठे, जनकल्याण हॉस्पीटलचे सर्व डॉक्टर्स, विठ्ठल कारखान्याचे आजी-माजी संचालक, सहकार शिरोमणी कारखान्याचे आजी-माजी संचालक, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: