Bhagat Singh
भगतसिंग, सुखदेव, व राजगुरु या त्रिमूर्तींनी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान हा स्वातंत्र्य चळवळीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. ''फाशी, आणि आम्हाला ती म्हणून? आम्ही तर स्वातंत्र्यांसाठी लढणारे क्रांतिकारक! आम्हाला थेट तोफेच्या तोंडी द्या! तोफेचे गोळे आम्ही फुलासारखे झेलू ! पण फाशीसारखी फुसकी शिक्षा भारतमातेच्या सुपुत्रांना देऊ नका'' असे उद्गार भगतसिंग यांनी आपल्याला शिक्षा सुनावणार्या मॅजिस्ट्रेटला दिले होते. हसत-हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करणार्या शहिद भगतसिंग यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता या वर्षी होत आहे. या महान क्रांतिकारकाविषयी………
भगतसिंग हे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श वीरपुरुष म्हणून मानत असत. महाराष्ट्राच्या लढाऊ स्वातंत्र्यप्रेमाविषयी त्यांना मोठा आदर होता. 1924 मध्ये ते महाराष्ट्रात आले असता शिवरायांच्या स्वराज्यातील राजधानी रायगडावर गेले आणि तेथील माती मस्तकाला लावून त्यांनी देशस्वातंत्र्यांची प्रतिज्ञा शिवरायांच्या नावाने पुनरुच्चारित केली.
भगतसिंग यांचे लिखाण, पत्रकं, लेख व पुस्तकं हे मुख्यत: क्रांतीकार्य वाढवण्यासाठी होतं. इंग्रजांच्या गुलामगिरीत जगणार्या भारतीयांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे, स्वातंत्र्यलढ्यासाठी युवकांची मानसिक तयारी करणे, ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण करणे तसेच जगातील व देशातील क्रांतिकारकांच्या जीवनकार्याची माहिती देऊन जनतेत स्वातंत्र्याची ओढ निर्माण करणे, ही भगतसिंगच्या लेखनामागील उद्दिष्ट्ये होती. वीररस हा त्यांच्या साहित्याचा आत्मा होता.
वाचन, मनन व चिंतन केल्याशिवाय भगतसिंग कोणतीही कृती करीत नसत. कीर्ती, प्रताप, अर्जून, चाँद, स्वाधीनता के लडाई में पंजाब का पहला उभार, आयडियल ऑफ सोशॅलिझम, दि डोअर टू डेथ, ऑटोबायोग्राफी, दि रिव्हाल्यूशनरी मूव्हमेंट ऑफ इंडिया, स्केच ऑफ दि रिव्होल्युशनरीज ही पुस्तके भागतसिंग यांनी लिहिली. विशेष म्हणजे क्रांतिकार्यासाठी देशाच्या कानाकोपर्यात भटकत असताना भगतसिंगांच्या कोटाच्या खिशात किमान एक तरी पुस्तक असायचेच.
भगतसिंग हे मुळचे पंजाबचे. या क्रांतिकारकांनी सप्टेंबर 1928 मध्ये दिल्ली येथे गुप्त बैठक घेऊन हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना केली व तिचे सेनापतीपद चंद्रशेखर आझाद यांच्याकडे सोपविण्यात आले.
30 ऑक्टोबर 1928 रोजी पंजाब प्रांतातील लाहोर स्थानकाबाहेर सायमन कमिशन आले असता पंजाब केसरी लाला लाजपतराय यांच्या नेतृत्त्वाखाली हजारों स्वातंत्र्यप्रेमी युवकांनी उग्र निदर्शने करुन 'सायमन गो बॅक' अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी लाहोरचे पोलिस अधीक्षक मिस्टर स्कॉट यांनी सँडर्स यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांना लाठीमारचा आदेश दिला. या बेसुमार लाठीहल्ल्यात वयोवृद्ध लालाजींचा मृत्यु झाला. या क्रूर व दुर्देवी घटनेचा सूड घेण्यासाठी भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी एक योजना आखली व त्यानुसार सँडर्सचा वध करण्यात आला. पण मिस्टर स्कॉट मात्र यातून वाचले. सँडर्स वधाच्या कटात हात असलेल्या सर्व क्रांतिकारकांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने त्यांना वेश पालटून लाहोरहून फिरोजपूर, आग्रा, पंजाब, बंगाल, महाराष्ट्र, मुंबई या शहरांमध्ये भूमिगत राहावे लागले होते.
19 मार्च 1929 रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कटकारस्थान केल्याबद्दल साम्यवादी नेत्यांची देशभर धरपकड झाली. राजबंद्यांच्या अभियोगासाठी आणि वर्गकलहाच्या बंदोबस्तासाठी पब्लिक सेफ्टी बिल, ट्रेड डिस्प्युटस बिल, प्रेस सेडिशन बिल या अन्यायकारी व जनविरोधी कायद्यांविरुद्ध भागतसिंग व त्यांच्या साथीदारांनी प्रचंड जनआंदोलन उभारले. ब्रिटिश राजवटीला धडा शिकविण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी 'इन्किलाब झिंदाबाद,' साम्राज्यशाही मुर्दाबाद' अशा गगनभेदी घोषणा देत केंद्रीय असेंब्लीत बॉम्ब फेकले. या खटल्याची सुनावणी 10 जून 1929 रोजी झाली आणि या दोन्ही क्रांतिकारकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
भगतसिंग व अन्य क्रांतिकारकांविरुद्ध असलेल्या विविध आरोपांवर अंतिम निकाल देण्यासाठी गव्हर्नर लॉर्ड डरविन यांनी जस्टीस जे. कोल्डस्ट्रीम यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधिशांचे एक स्पेशल ट्रायब्युनल नियुक्त केले. लाहोर खटला 5 मे 1930 रोजी सुरु झाला. हा खटला भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक रोमांचक प्रकरण होते. हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना, पंजाबपासून कोलकत्यापर्यंत क्रांतिकारकांच्या उठावाच्या कारवाया, पंजाब नॅशनल बँक लूट प्रकरण, सँडर्सचा खून खटला, आग्रा येथे बॉम्ब बनविण्याच्या प्रकरणात सहभाग, दिल्लीच्या विधिमंडळावर बॉम्ब फेकणे तसेच बॉम्ब बनविणे, खूनी हल्ले करणे, सरकार उलथून टाकण्याच्या विध्वंसक कारवाया करणे आदी गंभीर गुन्ह्यांखाली भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
फाशीची शिक्षा सुनावल्यावर हे क्रांतिकारक शहीद व्हायला उतावीळ झाले होते. भगतसिंग म्हणत, ''भारतमातेसाठीचे इतिकर्तव्य संपले. आमच्या बलिदानाने शेकडो युवक पेटून उठले पाहिजेत. त्यांनी आमचे अपुरे क्रांतिकार्य वेगाने व नेटाने चालवावे. मी खुशीने फासावर लटकून जगाला दाखवून देईन की, क्रांतिकारक आपल्या आदर्शांसाठी केवढ्या धीरांने बलिदान देतात.''
कारावासात कधी रिकामा वेळ मिळाला की, भगतसिंग हे शहीद रायप्रसाद बिस्मिल्ला यांच गाणं मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे…….. मोठ्या तन्मयतेने म्हणत असत. त्यामुळे राजकैद्यांमध्ये देशाप्रति निष्ठा व स्वाभिमान वाढीस लागे. भगतसिंग आपल्या आईला (बेबेजी) म्हणत, ''फाशी झाल्यावर तू माझं शव घ्यायला येऊ नको, कुलबीरला पाठव, कारण तू रडायला लागली तर लोक म्हणतील, भगतसिंगची आई रडत आहे'' राष्ट्राला उद्देशून लिहिलेल्या शेवटच्या पत्रात भगतसिंग म्हणतात ''आम्ही अंतिम प्रवासाला निघाला आहोत, आमचा नमस्कार घ्या.
प्रत्येक भारतीयाला भगतसिंग यांच्या रुपात साक्षात मृत्युंजय दिसत होता. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या हौतात्म्याविषटी नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, ''हे क्रांतीवीर जरी आपल्यातून निघून गेले असले तरी, त्यांच्या राष्ट्रप्रेमाची भावना अजिंक्य असून ती अमर आहे.'' जयकौर ( भगतसिंगची आजी) जेलमध्ये भेटायला आली असता हसत-हसत गंमतीने, भगतसिंग म्हणाले, ''ये आजी ! तुला एवढ्या लांबून भला भेटायला यायला फार त्रास होतो ना? तू असं कर, या जुलुमी सरकारविरुद्ध काहीतरी गंभीर गुन्हा कर, म्हणजे तुला माझ्या जवळच कैदी म्हणून कायमचं राहायला मिळेल'' भगतसिंग यांच्या महान क्रांतिकार्याची गाथा ऐकून रशियाचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांनी भगतसिंग यांना मास्कोला येण्याचे निमंत्रण दिले होते.
फाशीच्या आधी तुम्हाला काही शेवटी सांगायचं आहे का? असं मॅजिस्ट्रेटने विचारले असता, भगतसिंग म्हणाले ''क्रांती ये मानव का निसर्गदत्त हक है ! तो, आझादी ये उसका जन्मसिद्ध हक है ! आझादी और जिंदगी एक बात है ! तो गुलामी और मौत एक बात है'' हाच अखेरचा संदेश त्यांनी राष्ट्राला दिला. मॅजिस्ट्रेटला उद्देशून ते म्हणाले, मॅजिस्ट्रेट महोदय तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे की, भारतीय क्रांतीकारक आपल्या सर्वोच्च आदर्शासाठी मृत्युचं स्वागत कसं करतात.''
23 मार्च 1931 हा अमर दिवस उजाडला. तिघांना फाणी होणार म्हणून सारं राष्ट्र व्याकुळ झालं होतं. उजव्या बाजूला सुखदेव तर डाव्या बाजूला राजगुरु आणि भगतसिंग मधोमध उभे. त्यांच्यात प्रथम कोणी फासावर चढायचं, याबाबत प्रेमकलह होता. शेवटी आपसात तडजोड करुन सुखदेव, भगतसिंग आणि मग राजगुरु अशा क्रमाने फासावर चढण्याचं ठरलं. भगतसिंग म्हणाले ''दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उलफत ! मेरी मिट्टी से खुशबू-ए-वतन आएगी'' मृत्युकडे नेणार्या फासाचं त्यांनी चुंबन घेतलं. 'इन्किलाब झिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय' असा जयघोष देत हे तिन्ही क्रांतिकारक हसत-हसत फासावर चढले. आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी तिचे हे सुपूत्र शहीद होऊन अमर झाले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.