लखीमपूर हिंसा : राहुल-प्रियांका गांधी राष्ट्रपतींच्या भेटीला, दोन मागण्या मांडल्या
हायलाइट्स:
- काँग्रेसकडून राष्ट्रपतींसमोर दोन मागण्या
- केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांद्वारे चौकशीची मागणी
राष्ट्रपती भवनात जाऊन लखीमपूर हिंसाचार प्रकरणाशी निगडीत एक पत्र काँग्रेस प्रतिनिधिमंडळानं राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे सोपवलं. या प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून पीडितांना न्याय देण्याचं आवाहन या पत्राद्वारे करण्यात आलं आहे.
‘केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना पदावरून दूर करावं’
लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा टेनी याचे पिता जे सध्या गृह राज्यमंत्री पदावर आरुढ आहेत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. अजय मिश्रा टेनी गृह राज्यमंत्री पदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.
‘निष्पष्क्ष चौकशीसाठी…’
तसंच लखीमपूर हिंसाचाराच्या निष्पक्ष चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सद्य दोन न्यायाधीशांची समिती नेमण्याची मागणीही काँग्रेसकडून राष्ट्रपतींना करण्यात आलीय.
राष्ट्रपतींकडून आश्वासन
आजच्या या भेटीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मुद्यावर चर्चा करण्याचं आश्वासन दिल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय.
तर आपल्या भेटीविषयी सांगताना प्रतिनिधिमंडळात समावेश असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी, आम्ही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लखीमपूर खीरी हत्याकांडासंबंधी माहिती दिली. प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी तसंच गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी राजीनामा द्याव किंवा त्यांना पदच्युत केलं जावं, अशा दोन मागण्या मांडल्याचं सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात राज्य सरकारविरोधात टिप्पणी केल्यानंतरही केद्रीय मंत्री आणि त्यांच्या आरोपी पुत्राविरोधात योग्य कारवाई होऊ शकलेली नाही, असंही काँग्रेसनं म्हटलंय.
लखीमपूर हिंसाचार
३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील तिकोनिया क्षेत्रात घडलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसहीत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला होता. यात एका पत्रकाराचाही समावेश होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यानं शेतकऱ्यांच्या अंगावर आपली महिंद्रा थार गाडी पाठीमागून चढवल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. यामध्ये चार शेतकरी आंदोलकांचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता.