राज्यात करोना रुग्णसंख्येत घसरण; फक्त ‘या’ दोन जिल्ह्यात ५ हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण
हायलाइट्स:
- राज्यात नव्या करोना रुग्णांची संख्या झाली कमी
- रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.३८ टक्के
- एकूण २९ हजार ९५५ सक्रीय रुग्ण
राज्यात आज ३,१३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण ६४,११,०७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.३८ टक्के एवढं झालं आहे. राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०५,४६,५७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८३,८९६(१०.८७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३२,२६१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १,१२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सक्रीय रुग्णांच्या एकूण संख्येत घट
राज्यातील नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने सक्रीय रुग्णांच्या संख्येतही घसरण झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण २९ हजार ९५५ सक्रीय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या काल ३० हजार ५२५ इतकी होती तर हीच संख्या सोमवारी ३२ हजार ११५ इतकी होती.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या अधिक?
राज्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मात्र पुणे आणि मुंबई या मोठ्या दोन शहरांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजारांहून अधिक आहे. मुंबईत ५ हजार ९९७ आणि पुणे जिल्ह्यात ८ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात ३ हजार ७९८ आणि अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.