क्रांती दिनी भारतातील उपद्रवी परदेशी तणांना चलेजाव

क्रांती दिनी भारतातील उपद्रवी परदेशी तणांना चलेजाव

माबि हरित चळवळी अंतर्गत अनोखा उपक्रम साजरा

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०९/०८/२०२५- ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून देशभर साजरा होत असतो. याच दिवशी ब्रिटीश सरकार विरोधात चले जाव चा नारा दिला गेला. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळे निर्णायक अवस्थेत आला म्हणून या क्रांतिदिनाला महत्त्व आहे.या दिनाचे औचित्य साधत मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि); बायोस्फिअर्स; पुणे वनविभाग (प्रादेशिक); वन व्यवस्थापन समिती, घेरा सिंहगड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.०९ ऑगस्ट २०२५ (रक्षा बंधन) रोजी सिंहगड घाट, किल्ले सिंहगड वनक्षेत्रात उपद्रवी परदेशी तणांबाबत योग्य ती जनजागृती व पर्यावरणीय साक्षरता यावी या हेतूने प्रतीकात्मक दृष्टीने सिंहगड घाट परिसरात फोफावलेली टिथोनिया डायवर्सिफोलिया, टिथोनिया रोटून्डीफोलिया या मैक्सिकन उपद्रवी परदेशी तणाच्या उच्चाटन मोहीमेचे आयोजन केले होते.याबाबत जागर करून चले जाव चा नारा देण्यात आला.

सर्व उपस्थित हरित मावळ्यांनी उपद्रवी जैविक आक्रमणा विरोधात सांघिकरित्या शपथ (माबि प्रतिज्ञा) घेतली.

सदर उपक्रमाला स्थानिक-ग्रामस्थ, निसर्ग अभ्यासक, निसर्गप्रेमी, हरित-कार्यकर्ते, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्तिथी लक्षणीय होती. सदर उपक्रमाला बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक व पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर, वनपरिमंडल अधिकारी, सिंहगड-खानापूर चे समाधान पाटील,वनरक्षक बळीराम वायकर, वनव्यवस्थापन समिती सदस्य दत्ता जोरकर, स्थानिक ग्रामस्थ ज्ञानेश्वर कोडीतकर,नितीन गोळे,शांताराम लांघी,धनराज सांबरे, भानुदास जोरकर,शिवाजी लांघी,स्वप्नील सांबरे,राहुल जोरकर, चंदू सांबरे,ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पडेर,दत्ता पडेर यांची उपस्थिती होती.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपवनसंरक्षक पुणे प्रादेशिकचे महादेव मोहिते यांचे उत्तम सहकार्य लाभले.

जैविक आक्रमणाबाबतचा हा जागर आहे. पर्यावरण,आर्थिक व आरोग्यविषयक उपद्रवी तणांचे (वनस्पती व प्राणी) धोके लक्षात घेवून या अभिनव,पर्यावरण संवर्धन संघटनाचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे, जनजागृतीचा भाग म्हणून माबि या हरित चळवळीचे देशभर,राज्यभर,शहरभर, गावात, प्रभागात,उपशहरात,वन्यजीव संरक्षित क्षेत्रात व इतर संबधित ठिकाणी सातत्याने आयोजन केले जावे,या उपद्रवी परदेशी घटकांबाबतीत योग्य ते शासकीय धोरण असावे, लोकसहभागातून या परदेशी (आगंतुक) उपद्रवी जैविक घटकांचे आपल्या राष्ट्रातून समूळ उच्चाटन व्हावे.माबिच्या माध्यमातून तण मुक्त भारत म्हणजेच स्वच्छ भारत हा संदेश देखील जनमानसात रूढ करण्यात यावा या उद्देशाने जागतिक परिसंस्था पुनरुज्जीवन दशकाचे तसेच ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Back To Top