रायरेश्वर–राजगड–तोरणा संवर्धनासाठी भक्कम पाठबळ; आमदार शंकर मांडेकर यांचा यथोचित सन्मान
ऐतिहासिक किल्ले व स्मारकांसाठी मुबलक निधी लवकरच; शिववारशाच्या जतनासाठी ठोस पावले
पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज – आमदार शंकर मांडेकर व महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल यांची संयुक्त बैठक उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत आमदार मांडेकर यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडत रायरेश्वर, राजगड व तोरणा या ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सखोल चर्चा व प्रश्नोत्तर केले होते. त्या अनुषंगाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे आभार मानून यथोचित सन्मान करण्यात आला.

रायरेश्वर येथील मंदिरासाठी यापूर्वी मंजूर झालेल्या निधीतून कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली असून, पुढील टप्प्यात सभामंडप, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच देवीच्या मंदिरासाठी लवकरच नवीन निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यासोबतच जिवाजी महाले समाधी, सरदार कान्होजी जेधे समाधी, ऐतिहासिक गणेश मंदिर (आंबवडे), बांदल सेनेचे स्मारक,वीर बाजीप्रभू देशपांडे स्मारक तसेच यसाजी कंक स्मारक यांसाठीही लवकरच मुबलक निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याचे आश्वासन आमदार मांडेकर यांनी दिले.

चेलाडी येथील स्तंभाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असे स्पष्ट करत मी शिवकार्याची कामे केली नाहीत तर आमदार म्हणून माझा काय उपयोग ? असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सुमारे दोन तास चाललेल्या सविस्तर चर्चा व विचारविनिमया नंतर भोर व पुणे जिल्ह्यातील पदांचे वाटप करण्यात आले. या बैठकीमुळे शिवकालीन वारसा, किल्ले व स्मारकांच्या संवर्धनासाठी नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

