हडपसरमध्ये रुग्णालयावर हल्ला; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
रुग्णालयात गोंधळ,डॉक्टरांची दोषींवर कठोर कारवाईची मागणी
हडपसर पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज : हडपसर परिसरात सह्याद्री रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण केतु सपकाळ वय ७७ वर्षे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.त्यामुळे रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांशी वाद घालून शिवीगाळ करत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे डॉक्टरांच्या आणि रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हल्ल्याच्या घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास करुन हल्ल्यातील दोषींना कायद्यानुसार शिक्षा करावी अशी मागणी करत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. वैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवा असून डॉक्टरांवर आणि रुग्णालयावर होणारे हल्ले निषेधार्ह आहेत,असे मत विविध वैद्यकीय संघटनांनी व्यक्त केले आहे.
या प्रकारामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉक्टर संघटनांनी केली आहे. प्रशासनाने रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज व्यक्त होत आहे.





