श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित; ASI चा सविस्तर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर
मूर्ती संवर्धनासाठी शासन–ASI–मंदिर समितीचा समन्वय; भाविकांसाठी दिलासादायक माहिती
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/१२/२०२५ – श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तींच्या सुरक्षितता व दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार ASI च्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर केला आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून प्राप्त झालेल्या या अहवालास श्री विठ्ठल– रुक्मिणी मंदिरे समितीची मंजुरी घेऊन पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सदर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

सन २०२० मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर वज्रलेपाची संवर्धन प्रक्रिया करण्यात आलेली असून सध्या दोन्ही मूर्ती पूर्णतः सुरक्षित स्थितीत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र भविष्यात मूर्तींची कोणतीही झीज अथवा नुकसान होऊ नये या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाच्या मंजुरीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत.
यासंदर्भात श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने वारकरी, भाविक व नागरिकांना आश्वस्त करण्यात आले आहे की,श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित आहेत. मूर्तींच्या संरक्षण व संवर्धनासाठी शासन, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व मंदिर समिती यांच्यातील समन्वयातून नियोजित व शास्त्रीय कार्यवाही सुरू असून भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीने मूर्तींच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.
मूर्तींची झीज टाळण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.






