पोलीस पाटील दिनानिमित्त मंगळवेढा पोलीस ठाण्यात मार्गदर्शन बैठक; जनसंपर्क व ग्रामसुरक्षेवर भर
मंगळवेढ्यात पोलीस पाटील दिन साजरा; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांचा सत्कार
मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,१७/१२/ २०२५ -पोलीस पाटील दिनाच्या अनुषंगाने मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची आज मंगळवेढा पोलीस ठाणे येथे मार्गदर्शनपर बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस मंगळवेढा विभागीय पोलीस अधिकारी श्री.शिवपूजे,पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक श्री.पिसे,पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री.यादव, श्री.पवार, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल घोडके तसेच इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

यावेळी विभागीय पोलीस अधिकारी श्री. शिवपूजे यांनी उपस्थित पोलीस पाटलांना त्यांच्या कर्तव्यांची सविस्तर माहिती दिली. गावपातळीवर जनसंपर्क वाढवून गुन्ह्यांची आगाऊ माहिती संकलित करणे, ग्रामसुरक्षा दल अधिक सक्रिय करणे, तसेच नागरिकांमध्ये पोलीस–जनसंपर्क अधिक दृढ करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच ऑनलाइन गुन्हे व आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेता अशा गुन्ह्यांपासून नागरिकांनी कशा पद्धतीने सावध राहावे याबाबतही माहिती दिली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी पोलीस पाटील यांनी कशा पद्धतीने कार्य करणे अपेक्षित आहे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सेंद्रिय शेती उपक्रमाबाबत माहिती देत, सेंद्रिय शेतीचे फायदे स्पष्ट केले व सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांचा विभागीय पोलिस अधिकारी श्री.शिवपूजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्कारार्थी पोलीस पाटील पुढीलप्रमाणे —
- येळगी — सौ.राजश्री इंगोले,
- हुलजंती — जिवाजी सोनवले,
- घरनिकी — जावेद मुलाणी,
- लक्ष्मी दहिवडी — मधुकर पाटील
- डोनज — श्री. कोळी
सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.






