रूक्मिणी सभामंडपातील ऐतिहासिक चित्रे सुरक्षित; जतनकामांनंतर पूर्ववत बसविणार

श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरातील जतनकामे वेगात; श्री रूक्मिणी सभामंडपातील ऐतिहासिक चित्रे सुरक्षित स्थळी हलवली

रूक्मिणी सभामंडपातील ऐतिहासिक चित्रे सुरक्षित; जतनकामांनंतर पूर्ववत बसविणार

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26 : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिरांच्या जतन,संवर्धन व जिर्णोद्धाराची कामे शासनाच्या निधीतून पुरातत्व विभागामार्फत डिसेंबर 2023 पासून हाती घेण्यात आली आहेत. मंजूर आराखड्यानुसार ही कामे टप्प्याटप्प्याने राबविली जात असून पहिल्या टप्प्यात विठ्ठल गाभारा, रूक्मिणी गाभारा, बाजीराव पडसाळी तसेच विठ्ठल सभामंडप येथील जतन व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत.

सध्या श्री रूक्मिणी सभामंडप तसेच इतर अनुषंगिक भागांमध्ये जतन व संवर्धनाची कामे सुरू आहेत. सभामंडपात पूर्वी स्थापित करण्यात आलेली श्री रूक्मिणी स्वयंवराची ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाची चित्रे संरचनात्मक दुरुस्तीच्या काळात सुरक्षित राहावीत, कोणतेही नुकसान होऊ नये आणि त्यांची मूळ अवस्था अबाधित राहावी यासाठी ती तात्पुरत्या स्वरूपात काळजीपूर्वक काढून सुरक्षित स्थळी जतन करून ठेवण्यात आली आहेत.

सभामंडपातील कामे पूर्ण झाल्यानंतर सदरची ऐतिहासिक चित्रे मूळ ठिकाणी पूर्ववत पद्धतीने पुन्हा स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

मंदिर परिसरातील जतनकामांमुळे ऐतिहासिक वारसा जपण्यास आणि भाविकांसाठी अधिक सुरक्षित व सुबक व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Back To Top