वादळी वाऱ्याने पंढरपूर तालुक्यात मोठे नुकसान; तातडीने पंचनाम्यांचे तहसीलदारांचे आदेश
केळी, शेतीपिके, घरे व झाडांचे नुकसान; शेतकऱ्यांनी त्वरित तलाठी व कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज | दि. 06 जून 2026 : पंढरपूर तालुक्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीसह विविध शेतीपिकांचे,घरांचे तसेच झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना शासनाची नुकसानभरपाई मिळावी यासाठी तहसीलदार सचिन लंगुटे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

निवेदनाची दखल घेत तहसीलदार सचिन लंगुटे यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उंबरे (पागे), करोळे, कान्हापुरी, जळोली, सांगवी-बादलकोट, पेहे, नांदोरे तसेच करकंब मंडळातील सर्व गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधून नुकसानीचा पंचनामा करून घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय बापू नरसाळे,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमर इंगळे, सिताराम पाटील,प्रथमेश बोंगे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी,शेतकरी उपस्थित होते.






