समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी मोदी@९ हा उपक्रम- डॉ.बाळासाहेब हरपळे

वैद्यकीय आघाडी साधणार वारांगना, शेतकऱ्यांबरोबर संवाद

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन बैठक – सहसंयोजक डॉ.बाळासाहेब हरपळे यांची माहिती

मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या मोदी@९ कार्यक्रमात भाजपा वैद्यकीय आघाडीकडून वारांगना, शेतकरी, शहीद सैनिकांचे नातेवाईक आणि वंचित घटकातील कुटुंबांबरोबर संवाद साधण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यासह चहापान वा अल्पोपहार करीत केंद्र सरकारच्या योजनां संदर्भात माहिती दिली जाईल. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डॉ. बाळासाहेब हरपळे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपाकडून महाजनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले आहे.या अभियानाद्वारे समाजातील विविध घटकांपर्यंत सरकारी योजना पोचविल्या जात आहेत. महाजनसंपर्क अभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत भाजपा वैद्यकीय आघाडीने भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला राज्यभरातील १६५ हून अधिक डॉक्टरांची उपस्थिती होती.

केंद्र व राज्य सरकारच्या योजना परिणामकारक पद्धतीने पोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संयोजक डॉ.अजित गोपछडे व सहसंयोजक डॉ.बाळासाहेब हरपळे यांनी बैठकीत केले. त्यावेळी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर समाजात उपेक्षित असलेल्या वारांगना, वंचित घटकातील नागरिकांबरोबरच शेतकरी, शहीद सैनिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक वेळा गरजू नागरिकांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतात, त्याबाबतही सहकार्य करण्याची सूचना बैठकीत देण्यात आली. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला लाभार्थी म्हणून सहभागी करून जीवनमान बदलण्याचा भाजपा वैद्यकीय आघाडी प्रयत्न करीत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय आघाडीकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

डॉ राहुल कुलकर्णी संयोजक,कोकण विभाग यांनी मोदी @९ आणि वैद्यकीय आघाडी च्या संघटनात्मक बाबींचा ऊहापोह केला.संघटनवाढी साठी डॅाक्टरांच्या वैयक्तिक भेटीगाठीवर भर द्यावा असे प्रतिपादन केले.

बैठकीचे सुत्रसंचालन वैद्यकीय आघाडीचे समन्वयक डॅा स्वप्निल मंत्री यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: