पुढच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे काही खर नाही, BCCIने केली पराभवाची तयारी
Jaykrishna Nair | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Nov 10, 2021, 3:59 PM
भारतीय संघात मोठे बदल झाले आहेत. टी-२०चे नेतृत्व रोहित शर्माकडे तर मुख्य कोच म्हणून राहुल द्रविड यांची नियुक्ती झाली आहे. या नव्या सुरुवातीमध्ये अनेक आव्हाने देखील आहेत.
भारतीय संघ रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली नवी सुरुवात करणार आहे. या संघाचे लक्ष्य असेल ते २०२२ साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डपकचे विजेतेपद मिळवण्याचे होय. पण यातील मोठा अडथळा म्हणजे जे या टी-२० वर्ल्डकपमध्ये झाले तेच पुढील वर्ल्डकपमध्ये होऊ शकते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम होय. ऑक्टोबर २०२२ साली टी-२० वर्ल्डकप होणार आहे. २०२२ साली आयपीएलमध्ये १० संघ असणार आहेत. त्यामुळे स्पर्धेचा कालावधी वाढेल. या स्पर्धेत सर्व खेळाडू ताकद पणाला लावतात त्यामुळे पुन्हा राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठीची ताकद कमी पडली हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.
भारतीय संघाचा कार्यक्रम
१७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. त्यानंतर २ कोसटी सामने होतील. न्यूझीलंडनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा २६ जानेवारीपर्यंत असेल. तेथे ३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी-२० सामने खेळायचे आहेत. आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. हा दौरा ६ फेब्रुवारीपासून असेल. त्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरीस श्रीलंका दौरा असेल. हा दौरा झाल्याबरोबर आयपीएलचा १५वा हंगाम सुरू होईल. जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येईल. त्यानंतर वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघ क्रिकेट खेळतच राहणार आहे. यामुळे २०२१च्या वर्ल्डकपची कॉपी पुन्हा २०२२ मध्ये होऊ शकते.
भारताचा हा व्यस्त कार्यक्रम पाहता टीम इंडियालचे नवे कोच, कर्णधार आणि बोर्ड नेमके कसे नियोजन करते हे पाहावे लागले.