जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गनाद उपक्रम साजरा
३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा वर्षारंभ (शिवशक) आणि वट पौर्णिमेचे औचीत्य साधत …

पुणे / डॉ अंकिता शहा,ज्ञानप्रवाह न्यूज, 05/06/2023- बायोस्फिअर्स, इकोस्फिअर, व्हॉइस ऑफ वाइल्ड यांच्या पुढाकाराने आणि झपुर्झा व वनराई यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक ०३ जून २०२३, दु. ३ ते ५, जागतिक पर्यावरण दिनाचे, ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा वर्षारंभ यांचे औचित्य साधून आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने झपुर्झा, कुडजे-पुणे येथे निसर्गनाद या पंचमहाभूतांवर आधारित उपक्रमाचे आयोजन केले होते.

या उपक्रमात आपण पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश तत्वातील नाद हा नृत्य आणि दृकश्राव्य माध्यमातून अनुभवले. या प्रत्येक पंचतत्वाशी निगडित विषयाबाबत समर्पित भावनेतून उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींचा (पृथ्वी मित्र – रमेश मोगल – जैव प्रयोगशील शेतकरी, सेंद्रिय शेती- मृदा संवर्धन – निसर्ग साक्षरता; जल मित्र – उपेंद्र धोंडे – भूजल शास्त्रज्ञ – सहज जलबोधकार, जल साक्षरता – जल संवर्धन, वायू मित्र – मारुती गोळे – गरुडझेप संस्थापक व इतिहासकार, शिवकार्य – बलोपासना – गडकोट भटकंती आणि इतिहास संशोधन, अग्नी मित्र- विवेक मुंडकुर – उर्जा नव – प्रवर्तक , उर्जा निर्मितीसाठी केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग व संबंधित साधन निर्मिती आणि आकाश मित्र – अथर्व पाठक – खगोल शास्त्रज्ञ आणि शिक्षक, खगोलशास्त्र संशोधन, प्रबोधन आणि संबंधित शैक्षणिक क्षेत्र यांचा यथोचित सन्मान देखील केला गेला. पर्यावरण आणि जैव विविधता बाबतीत काही लघुपटांचे सादरीकरण आणि माहिती पत्रकाचे अनावरण देखील या प्रसंगी करण्यात आले. ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा वर्षारंभ लक्षात घेता नृत्याच्या आणि माहिती पत्रकाच्या माध्यमातून कलाकारांकडून शिववंदना दिली.

सदर उपक्रमात श्वेथा लक्ष्मीनरसिम्हन, मानसी काळे,सानिका चव्हाण,क्षितिजा घाणेकर, मैथिली कुलकर्णी, वेदिका कुलकर्णी हे कलाकार सहभागी झाले होते. महाराष्ट्राचा वारसा वृक्ष असलेल्या आळंदी येथील सुवर्ण पिंपळ बीज प्रसादही नागरिकांना देण्यात आला.

या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना आणि निर्मिती डॉ.सचिन अनिल पुणेकर आणि निवेदिता जोशी यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंद्रजितसिंह घोरपडे गजेंद्रगडकर यांनी केले.अजित गाडगीळ, रवींद्र धारिया, अमित वाडेकर,सुनील पाठक, शैलेंद्र पटेल,अमित जगताप, अमित पुणेकर, सागर सोनवडेकर यांचे सहकार्य या उपक्रमात लाभले. जागतिक पर्यावरण दिना निमित्त निसर्गनाद अनुभवण्याची एक पर्वणी जनमाणसांना या उपक्रमाद्वारे निश्चित मिळाली.