ज्येष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे दुःखद निधन
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ : ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.ही दुःखद घटना कळताच शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

कै.नरेंद्र चपळगावकर यांची उत्कृष्ट न्यायमूर्ती, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ साहित्यिक अशी ओळख होती. वर्धा येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते व मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी विपुल लेखन केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
‘मराठी साहित्यविश्व आणि न्यायव्यवस्थेतील एक महान व्यक्तिमत्व हरपले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो आणि ईश्वर माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या आत्म्यास सद्गती देवो,अशी प्रार्थना उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केली.

