जीवनात यशस्वी होण्यासाठी आई, वडील व गुरुजन यांचा आदर राखावा-पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील
स्वेरीमध्ये जागतिक महिला दिन साजरा

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०३/२०२५ : महिला दिन साजरा करताना माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले,राहीबाई पोपेरे यांच्या अद्भूत कार्याला आपण वंदन केले पाहिजे. एक महिला काय करू शकते, याची प्रचीती त्यांच्या कार्यातून येते. ज्यावेळी मी लहान होते तेव्हा कलेक्टर होण्यासाठी काय करावे लागेल या प्रश्नावर बाबा म्हणाले अभ्यास करावा लागतो,वर्गामध्ये पहिला नंबर काढावा लागतो.बाबांच्या या वाक्याने मी माझे ध्येय तिथेच निश्चित केले आणि त्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. म्हणून जीवनात जर पुढे जायचे असेल तर प्रेरणादायी मार्गदर्शन घेतले पाहिजे. तसेच आपल्याला जर उच्च पद गाठायचे असेल तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. परिश्रम करण्याची तयारी,आत्मविश्वास पूर्ण संभाषण या बाबी देखील महत्वाच्या आहेत. जिद्द व चिकाटीच्या जोरावर अनेक अवघड परीक्षा सहज उत्तीर्ण करता येतात.जीवनात आई,वडील व गुरुजन यांचा आदर राखावा व त्यांच्या प्रेरणेने,मार्गदर्शनाने जीवनाचे ध्येय गाठावे.असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी केले.
गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुटमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील ह्या मार्गदर्शन करत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून पंढरपूर विभागाच्या ब्रम्हकुमारी उज्वला बहेनजी या होत्या.विशेष अतिथी म्हणून मंत्रालयातील अधिकारी विक्रम शिंदे हे उपस्थित होते.

महाराष्ट्र गीत व स्वेरी गीता नंतर प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की, कोणत्याही प्रसंगांना सामोरे जात असताना आपल्याला नवनवीन बाबी शिकायला मिळत असतात. त्यामुळे समाजात वावरताना आपण विविध बाबी शिकून घेतल्या पाहिजेत. मिळणाऱ्या यशानं हुरळून जायचे नाही आणि जर दु:ख वाट्याला आले तर खचून जायचे नाही. हाच जीवनाचा मार्ग आहे.’ असे सांगून त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ, अंतराळ कन्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी व स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी स्वाती सापळे या यशस्वी महिलांचा संघर्षात्मक प्रवास सांगितला.

विशेष अतिथी विक्रम शिंदे म्हणाले की, महिलांची आजची परिस्थिती बदलण्यासाठी सर्वात प्रथम आपली मानसिकता बदलली पाहिजे. आज मी पत्नीमुळे स्वेरीच्या या स्टेजवर येवू शकलो.आज मंत्रालयामध्ये काम करत असताना सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण आल्यास हाक द्या, मार्गदर्शन करतो. स्पर्धा परीक्षा संदर्भात मी विद्यार्थ्यांंना केंव्हाही सहकार्य करण्यास तयार आहे.
प्रमुख पाहुण्या उज्वला बहनजी म्हणाल्या की, जेथे नारीची पूजा होते तेथे देवता वास करते.धन देवता,शक्ती देवता,ज्ञान देवता या सर्व महिला आहेत.त्यामुळे प्रथम महिलांचे नाव घेतले जाते.आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहे तेथे देखील महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला कार्य करत आहेत. आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपले ध्येय निश्चित करावे व त्या दिशेने प्रामाणिक वाटचाल करावी असे सांगून उपस्थितांकडून दहा मिनिटे मेडिटेशन करून घेतले.

स्पर्धा परीक्षा विषयीच्या अनेक प्रश्नांना विक्रम शिंदे आणि राजश्री पाटील यांनी समर्पक उत्तरे दिली.महिला दिनी स्वेरीच्या वतीने गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे,सौ.वंदना रोंगे यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी.मणियार,डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ,डिग्री इंजिनिअरिंग च्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस.मठपती आदींसह सर्व अधिष्ठाता,विभागप्रमुख,प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी प्रतिनिधी नम्रता घुले, इंजिनिअरिंग व फार्मसीच्या पदवी व पदविका या चारही महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.नेहा घोरपडे, पूनम शिंदे व डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.
स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी रेश्मा चव्हाण या सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेवून आज त्या मंत्रालयात कामकाज करत आहेत. प्रत्येक मंत्र्यांच्या निवासाचे त्या उत्तम नियोजन करत आहेत.या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो यावरून प्रेरणा मिळते -विक्रम शिंदे अधिकारी मंत्रालय मुंबई
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.